May 14, 2026 5:47 pm

रायगड जिल्ह्यातील तब्बल ४५७ अंगणवाडी सेविका दहावीची परीक्षा उत्तीर्ण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये रायगड जिल्ह्यात “शिक्षणाची पुनःसंधी” (सेकंड चान्स प्रोग्राम) हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत विविध कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या महिला व मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून इयत्ता 10 वी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. सदर उपक्रमांतर्गत 188 अंगणवाडी सेविकांनी 10 वीची परीक्षा दिली होती व त्यापैकी 181 सेविकांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच 294 अंगणवाडी मदतनीसांनी परीक्षा दिली व त्यापैकी 276 मदतनीसांनी यशस्वीपणे 10 वी उत्तीर्ण केली आहे. याशिवाय 25 इतर महिलांनीही या उपक्रमाच्या सहाय्याने 10 वीची परीक्षा दिली व त्या उत्तीर्ण ही झाल्या.

यासाठी 17 नंबर फॉर्म भरून महिलांना बोर्ड परीक्षेस बसण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य करण्यात आले. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये आठवड्यातील 5 दिवस, दररोज 4 तास, मोबाईल अॅपद्वारे दहावीचा अभ्यासक्रम शिकवण्यात आला. तसेच दर शनिवारी विविध माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन व सराव करण्यात आले.

दर महिन्याला बोर्डाच्या परीक्षा पेपरच्या सराव चाचण्या घेण्यात आल्या. या यशामुळे महिलांमध्ये नव्या आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली असून शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग अधिक दृढ झाला आहे. तसेच त्यांनी पुढील शिक्षण नियमित करण्यासाठी प्रेरणा प्राप्त झाली असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. महिलांना अभ्यासाचे मार्गदर्शन, परीक्षा तयारी, समुपदेशन व सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला.

कार्यक्रमातून यश संपादन करणा-या सर्व उत्तीर्ण अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व इतर महिलांचे रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, जिल्हा परिषद प्रशासन तसेच प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व वैयक्तिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!