May 14, 2026 12:17 am

पुण्यात व्हिक्टोरिया स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंचा जलवा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : दि. ८ ते १० मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऑल महाराष्ट्र राज्य चिल्ड्रन, कॅडेट अँड ज्युनिअर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत व्हिक्टोरिया स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक उंचावला. पुण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगाव येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत फाउंडेशनच्या २१ खेळाडूंनी सहभाग नोंदवत विविध पदकांवर आपले नाव कोरले.

किकबॉक्सिंग महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, शिस्तबद्ध खेळ आणि आत्मविश्वासपूर्ण प्रदर्शन सादर केले. विशेष म्हणजे विश्वजा गोगावले, श्लोक सनस आणि संभव केवरे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके पटकावत दुहेरी सुवर्ण यश संपादन केले.

तसेच सायली तकभाते, ज्योती पठाडे, विवा शाह, अर्जुन गोलम, ऋतुराज बाबर आणि पुष्पक पांचाळ यांनी सुवर्ण पदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. अथर्व अन्हेराव, ममता सग्गम आणि ऋतुराज बाबर यांनी रौप्य पदक मिळवले, तर समर्थ सर्वे, प्राची कुंभार आणि अथर्व अन्हेराव यांनी कांस्य पदक प्राप्त केले.

या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या खेळाडूंची आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. कॅडेट अँड सब-ज्युनिअर नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ ही स्पर्धा १७ ते २१ जून दरम्यान इंदौर, मध्य प्रदेश येथे होणार असून ज्युनिअर नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ ही स्पर्धा ३० मे ते ३ जून दरम्यान खोरधा, ओडिशा येथे पार पडणार आहे.

या यशामागे मुख्य प्रशिक्षक अतुल गोडसे यांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षक शुभम सरोज आणि सिद्धार्थ शर्मा यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, कठोर मेहनत आणि योग्य नियोजन मोलाचे ठरल्याची भावना खेळाडू व पालकांनी व्यक्त केली.

व्हिक्टोरिया स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या यशस्वी कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थेवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही हे खेळाडू राज्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!