May 14, 2026 3:06 am

आवाज असावा तर असा, आकाश महाराजांनी ‘धुरंधर 2’ च्या गाण्यावर गायली चाल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

गेल्या काही दिवसांपासून ‘धुरंधर 2’ या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

विशेष म्हणजे या चित्रपटातील अनेक जुन्या गाण्यांना नव्या ढंगात सादर करण्यात आलं असून त्यावर लाखो रील्स तयार झाल्या आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

मात्र आता या चित्रपटातील एका गाण्याची चर्चा थेट वारकरी संप्रदायातही रंगताना दिसत आहे. वारकरी कीर्तन परंपरेत प्रसिद्ध असलेले आकाश महाराज आरसुळ यांनी ‘धुरंधर 2’ मधील गाण्याच्या धर्तीवर अभंगाला दिलेली चाल सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आकाश महाराज आरसुळ यांनी ‘तुका म्हणे माझे’ या अभंगाला अत्यंत वेगळ्या शैलीत सादर केलं. त्यांच्या या सादरीकरणाला पखवाजाची सुंदर साथ कृष्णाजी महाराज भोसले यांनी दिली. पारंपरिक वारकरी शैली आणि आधुनिक गाण्याच्या चालीचा सुंदर संगम प्रेक्षकांना चांगलाच भावला. या व्हिडीओमध्ये महाराजांनी अत्यंत सुरेल आवाजात अभंग सादर केला असून त्यांच्या सादरीकरणातील ऊर्जा आणि भावनेमुळे अनेकजण भारावून गेले आहेत.

आकाश महाराजांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी लई गोड म्हटलं महाराज, कडक चाल, खूप सुंदर आवाज आहे, वारकरी संप्रदायाचा अभिमान अशा प्रतिक्रिया देत आकाश महाराजांचं कौतुक केलं आहे. काहीजण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा ऐकत असल्याचंही सांगत आहेत.

आकाश महाराज आरसुळ हे आपल्या कीर्तनांमध्ये नेहमीच वेगवेगळ्या चालींमध्ये अभंग सादर करत असतात. पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा मिलाफ साधण्याची त्यांची शैली अनेकांना आवडते. त्यामुळे तरुणांमध्येही त्यांच्या कीर्तनांना मोठी पसंती मिळत आहे.

‘धुरंधर 2’च्या गाण्याच्या धर्तीवर त्यांनी सादर केलेल्या या अभंगामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अनेकांनी तर महाराजांनी धुरंधर 2 लाच टक्कर दिली अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियामुळे अशा कलावंतांना मोठं व्यासपीठ मिळत असून आकाश महाराजांच्या या व्हिडीओने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की चांगलं सादरीकरण लोकांच्या मनाला थेट भिडतं.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!