May 14, 2026 7:18 am

माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारेंचे निवृत्तीनंतरही बांधकाम विभागात वर्चस्व

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे निवृत्त होऊन बराच काळ लोटला असला, तरी बांधकाम विकास विभागावर अजूनही त्यांचेच वर्चस्व असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.वाघमारे यांच्या मर्जीतील या अधिकाऱ्यांना युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी ‘आकाचे चेले’ असे संबोधले आहे.

सदर अधिकारी तांत्रिक गुणवत्ता नसतानाही वर्षानुवर्षे याच विभागात ठाण मांडून बसले आहेत. तसचे हे अधिकारी महापालिका प्रशासनापेक्षा खाजगी हितालाच प्राधान्य देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात यादव यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सामान्य प्रशासन विभाग आणि नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही अधिकाऱ्याला एकाच विभागात ठराविक वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. मात्र, पुणे मनपाच्या बांधकाम विभागात हे नियम केवळ कागदावरच राहिले आहेत. जयवंत पवार (कार्यकारी अभियंता), सुरेश साखळे (कार्यकारी अभियंता), संजय शिंदे (कनिष्ठ अभियंता/तांत्रिक पीए), प्रवीण शेंडे (अधीक्षक अभियंता), संदीप चाबुकस्वार या अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली केल्याचा दावा यादव यांनी केला आहे.

हे अधिकारी वाघमारे यांच्या कार्यकाळापासून आजतागायत याच विभागात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, यातील अनेक अधिकारी केवळ डिप्लोमा धारक असूनही, इतर पात्र आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांना डावलून त्यांना नियमबाह्य पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. यासाठी मुख्य सभेची कोणतीही रीतसर मान्यता घेण्यात आलेली नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

या ‘भ्रष्ट टोळी’ने आपल्या पदाचा गैरवापर करून हजारो कोटी रुपयांच्या टीडीआर प्रकरणांमध्ये आणि चुकीच्या बांधकाम परवान्यांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “या अधिकाऱ्यांनी पुण्याचा चेहरा विद्रुप केला असून, पुण्याचे नियोजन खड्ड्यात घातले आहे,” अशी टीका यादव यांनी केली आहे. शहराच्या विविध भागांत लागलेल्या बॅनर्सनी या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला असून, आता आयुक्त साहेब यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एका बाजूला आयुक्त नवलकिशोर राम आपली स्वच्छ प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे त्यांच्याच नाकाखाली बांधकाम विभागात नियमांची अक्षरशः पायमल्ली सुरू आहे. यादव यांनी प्रेसनोट जाहिर करत पालिकेच्या पाच शिलेदारांचे पितळ उघडे पाडले आहे. बांधकाम विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या काही ठराविक अधिकाऱ्यांची नावे आता चव्हाट्यावर आली आहेत. या अधिकाऱ्यांनी तांत्रिक योग्यता नसतानाही केवळ वाघमारे यांच्या मर्जीमुळे मोक्याच्या जागा मिळवल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, पुणे महापालिकेचे प्रशासन नक्की कोण चालवतंय? सामान्य प्रशासन विभाग आणि नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांना केराची टोपली दाखवून या अधिकाऱ्यांचे ‘मायाजाळ’ फोडण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का?

दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि बेसुमार संपत्तीची चौकशी ‘आर्थिक गुन्हे शाखे’कडून (इओड्ब्ल्यू) करण्याची मागणी जोर धरत आहे. आयुक्तांनी त्यांच्या स्वच्छ प्रतिमेला साजेसा निर्णय घेऊन या ‘पिलावळीचा’ बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत.

कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांची संपूर्ण कारकीर्द केवळ बांधकाम परवानगी विभागातच गेली आहे. नियमानुसार, ठराविक काळानंतर बदली होणे अपेक्षित असताना, पवार यांना मात्र, या विभागातून कोणीही हलवू शकले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या पदोन्नतीसाठी खुद्द वाघमारे यांनी अधिकारांचा वापर करून मुख्य सभेची मान्यता न घेता शासनाच्या धोरणात बदल करण्यास भाग पाडले. जेष्ठता यादीत मागे असतानाही त्यांना टीडीआर आणि झोन ३ सारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पदांवर बसवण्यात आले आहे.

सुरेश साखळे हे पदविका अभियंता असूनही त्यांना नियमबाह्य पदोन्नती देण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी देखील गेल्या दशकभरापासून याच विभागात कार्यरत आहेत. प्रशासकीय आणि आर्थिक हितसंबंधांच्या जोरावर हे दांपत्य इतर विभागात नियुक्ती असतानाही बांधकाम विभागातच कार्यरत आहे. हे अधिकारी पालिकेसाठी नव्हे, तर खासगी विकासकांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत.

२०१७ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालेले संजय शिंदे यांनी अल्पावधीतच वाघमारे यांचा विश्वास संपादन केला. ते पदविका धारक असूनही त्यांची तांत्रिक सहाय्यक (पीए) म्हणून नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी त्यांची बदली झालेली असूनही, कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय ते आजही त्याच लाभाच्या पदावर काम करत आहेत.

अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अर्धवेळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची बदली झाली होती; मात्र वाघमारे यांच्या मर्जीमुळे त्यांना पुन्हा अधिक्षक अभियंता या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. त्यांच्यापेक्षा अनुभवी आणि पात्र अभियंता असतानाही शेंडे यांना झुकते माप दिले जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!