कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या कारला सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास पुणे येथील पिरंगुट घाटात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात छाजेड यांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे.
या अपघातात छाजेड यांचा ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे. उपचारासाठी छाजेड यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अभय छाजेड हे पिरंगुट मधील त्यांच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून ते पुण्याकडे त्याच्या इलेक्ट्रिक कारने येत होते. ते चालकाच्या शेजारील आसनावर बसले होते. पिरंगुट घाटात कारचे नियंत्रण सुटले आणि ती टेकडीला आदळली. यात चालकासह ते जखमी झाले. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना ओळखले आणि एम्ब्युलन्सने पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले आहे. त्याच्या चेहरा, मान, मणक्याला दुखापत झाली आहे.
अभय छाजेड यांना कंबरेच्या खाली मार लागल्याचे सूत्रांचे म्हणणे असून त्यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत. वकील असलेले अभय छाजेड हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि पुण्याचे प्रमुख नेते आहेत. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. ते पाच वेळा पुणे महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत.











