May 14, 2026 9:39 am

पापड, लोणचे, कुरडया मिळणार महापालिकेच्या विभाग कार्यालयात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

उन्हाळ्यात घराघरांत तयार होणाऱ्या पारंपारिक वाळवणीच्या पदार्थांचा आस्वाद आता मुंबईकरांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेले पापड, कुरडई, लोणचे, मेतकूट, तिळकूट, डांगर, सांडगे, सुक्की मच्छी, विविध मसाले आणि अन्य घरगुती खाद्यपदार्थांची मेजवानी मुंबई महापालिकेच्या ‘वाळवण महोत्सव २०२६ – सुगंध उन्हाळ्याचा’ या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.

महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयात ११ आणि १२ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाळवण महोत्सव सुरू राहणार आहे.

महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि महिला उद्योजकतेला चालना मिळावी, या उद्देशाने महापालिका प्रशासन विविध उपक्रम हाती घेत असते. त्याच अनुषंगाने महिला सक्षमीकरणाला चालना देतानाच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कार्यरत महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वाळवणीच्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात करण्यात येणार आहे. गहू, तांदूळ, नाचणी आणि बटाट्यांपासून तयार करण्यात आलेल्या कुरड्या व पापड, कैरी आणि लिंबाचे लोणचे, सांडगे, सांडगी मिरची, घरगुती मसाले तसेच अन्य पारंपरिक खाद्यपदार्थ हे महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहेत.

शहरात पुरेशी मोकळी जागा आणि वेळेअभावी वाळवणाचे पदार्थ तयार करणे अनेक महिलांना शक्य होत नाही. ग्रामीण आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची चव शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. नागरिकांना पदार्थांची चव प्रत्यक्ष अनुभवता यावी, यासाठी ‘टेस्टिंग काऊंटर’चीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात ११ आणि १२ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा महोत्सव भरवण्यात येणार आहे

लहान घरे, मर्यादित मोकळी जागा आणि बदलती जीवनशैली यामुळे पारंपरिक वाळवणीची पद्धत हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यास महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही हातभार लागेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. पारंपरिक उन्हाळी खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आणि महिला बचत गटांना पाठबळ देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन मीनल तुर्डे तसेच नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!