मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. परभणी आणि लातूर जिल्ह्यातील या अपघाताच्या घटनेत एकूण तीन ठार झाले असून एक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील यशवाडी शिवारात एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मानवतमधील अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली असतानाच, लातूरमध्ये अघातात एकजण ठार झाल्याचे समोर आलं आहे. येथे कारने दुचाकीवरील दोघांना उडवल्याने एक ठार तर एक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. अहमदपूर-अंबाजोगाई रोडवरील ह्या विचित्र अपघातानंतर बेपत्ता व्यक्तीचा लोकांकडून शोध घेतला जात आहे.
परभणीच्या मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 61 वर यशवाडी शिवारात एसटी बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य हे जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथील रहिवासी होते. ते यशवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून परत जात असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.मृतांची ओळख पटविण्याचे व पुढील कार्यवाहीचे काम सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या काजळ हिप्परगा गावाजवळ आज भीषण अपघात झाला. अहमदपूरकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या ब्रेझा कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. कार चालकाने आपली बाजू सोडून राँग साईडने जात मोटरसायकलला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल चालक तब्बल 50 ते 60 फूट दूर फेकली गेला असून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर, मोटरसायकलवर मागे बसलेली व्यक्ती अपघातानंतर बेपत्ता झाल्याचे सांगितले जात असून तिचा शोध सुरू आहे. त्यासाठी त्या भागातील अनेक लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा लांबपर्यंत जात बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू केला मात्र अद्याप बेपत्ता व्यक्तीचा शोध लागला नाही. ब्रेझा कार चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतरही बराच वेळ पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनीच मृत व्यक्ती आणि जखमीला सरकारी रुग्णालयात हलवले. उशिराने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.











