“आम्ही एवढीच मागणी करतोय, बाबूसाहेब, एवढ्या लहान लेकराची हत्या केली, साडेतीन वर्षांचं लेकरू ते, मारुन टाकली. काय त्या पोरीचं पाहतो. कचऱ्यासारखी पोर फेकून दिली.
आमच्या पोराला फासावर लटकावा,तो सुटला नाही पाहिजे, पार त्यााला फाशी द्या. आमच्यावर कृपा करा” असं म्हणत एका बापाने आपल्याच पोटच्या सैतान मुलाला शिक्षा देण्याची मागणी केली. पुण्यातील जुन्नर इथं या विकृत तरुणाने आपल्या पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जुन्नरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
जन्मदात्या बापाने पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि त्यात चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याची तर मुलगा बचावल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली. सागर शिंदे असं या नराधमाचं नाव आहे. या नराधम आरोपीला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे. पण, त्याचे वडील सदाशिव शिंदे यांनी रडरड सागरला फाशी देण्याची मागणी केली.
“आम्ही एवढीच मागणी करतोय, बाबूसाहेब, एवढ्या लहान लेकराची हत्या केली, साडेतीन वर्षांचं लेकरू ते, मारुन टाकली. काय त्या पोरीचं पाहतो. कचऱ्यासारखी पोर फेकून दिली. आमच्या पोराला फासावर लटकावा, उद्या हा सुटला तर आमचं काही बरं वाईट करेल. एक पोरगं वाचलं आहे त्यालाही उद्या मारायला कमी करणार नाही. आम्हाला काय मारलं बिरलं तर आाम्ही काय करणार आहे. तो अंगाने किती दांड आहे, तो सुटला नाही पाहिजे, पार त्यााला फाशी द्या. आमच्यावर कृपा करा. आमचा घात करेल सुटल्यावर, आमची विनंती आहे त्याला फासावर चढवा, परत आमच्याकडे येऊ देऊ नका” अशी हात जोडून सदाशिव शिंदेंनी विनंती केली.
“पोरीची हत्या केल्यानंतर तो परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप नव्हता. दाढी आणि कटिंग करून परत आला होता. त्याचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्याच्या बायको आणि त्याच्यामध्ये काही तरी भांडण झालं होतं. ९ महिन्यांपूर्वी लेकरांना सोडून गेली होती. त्यानंतर त्याच्या बायकोनं पोलिसांमध्ये तक्रारही दिली होती. या विकृत सागरने मला पोरं नकोय, असं सांगितलंही होतं. त्याच्या बायकोला आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तिच्याकडे काही फोन नाही. आमच्या मोठ्या मुलाचा अपघात झाला होता. त्याच्या पायात फॅक्चर आला होता. गेल्य ५ वर्षांपासून सांभाळत आहे. पण सागरने घर सोडून गेला होता. घरी कुणाला मदत केली नाही. भाड्याने राहून त्याने अडीच- दोन लाखांचं कर्ज केलं होतं. पण घरी आला नाही. त्याच्या आईचं निधन झालं तेव्हा काय तो आला, मग आमच्याकडे थांबला होता, असंही सदाशिव शिंदेंनी सांगितलं.
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी जुन्नर तालुक्यातील संतवाडी इथं ही घटना घडली. पुणे नाशिक हायवे रोडालगत असणाऱ्या फॉरेस्टमधून एक अंदाजे ०५ वर्षाचा मुलगा रडत येताना दिसला, त्यामुळे त्या लहान मुलाकडे चौकशी केली असता, त्याने सांगितलं की, ” माझे नाव आर्यन सागर शिंदे असून माझे पप्पा सागर शिंदे हे मला आणि माझी लहान बहीण हर्षदाला फिरायला जायचे आहे असे सांगून आम्हांला मोशीवरून घेवून आले आणि मला रात्री जंगलात सोडले, पप्पा, हर्षदा हे कुठे गेले हे मला माहिती नाही” असं सांगितलं. त्यानंतर आम्ही चौकशी करून त्याचे आजोबा सदाशिव लक्ष्मण शिंदे यांना संपर्क करून त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं. सागरने दुसरीकडे रूम घेतल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे मुलांना घेऊन तिथे गेला होता.
त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सागर शिंदे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तेव्हा त्याने मुलीची हत्या केल्याचं उघड झालं. सागर सदाशिव शिंदेची आळेफाटा पोलीस स्टेशन इथं आणून त्याच्याकडे मुलीबाबत कसून चौकशी केली असता, त्याने त्याच्या मुलीचा गळा दाबून तिचा खून केल्याची कबुली दिली. मुलीचा मृतदेह हा फाऊंटन हॉटेलचे समोर असणाऱ्या फॉरेस्टमध्ये रात्रीच्या अंधारात टाकून दिला होता. मुलगा त्यातून वाचला होता. पोलिसांना ७ मे रोजी फॉरेस्टच्या आतमध्ये सदर मुलीची मयत बॉडी गुन्हे शोध पथकास मिळून आली. त्यानंतर कायदेशीर कारवाई पूर्ण करून सदर मुलीची मयत बॉडी ही पोस्टमॉर्टेमसाठी पाठवली आहे. सागरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.











