May 14, 2026 9:02 am

प्रेमप्रकरणातून तरुणीचा गळा ब्लेडने चिरला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील चंदननगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून २२ वर्षीय तरुणीचा गळ्यावर ब्लेडने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दिलीप राठोड (२२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि पीडित उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (२२, रा. चंदननगर, मूळ उत्तर प्रदेश) हे एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते.

या वादातून संतापलेला दिलीप राठोड बुधवारी पीडित तरुणी राहत असलेल्या पठारेवस्तीतील घरात घुसला. त्या वेळी घरात ती एकटीच होती. तिचा भाऊ आणि भावजय कामावर गेले होते. आरोपीने तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. हल्ला झाल्यानंतर तो पसार झाला.

जखमी अवस्थेत असलेल्या उजालादेवीने फोन करून भावाला घटनेची माहिती दिली. “लवकर घरी ये, एका मुलाने मला मारले आहे, खूप लागले आहे, गळ्यातून आवाज येत नाही,” असे तिने सांगितले. नंतर तिने भावाला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलमध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. भाऊ तातडीने घरी आला. तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी जमा झाले होते. त्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. बोलता येत नसलेल्या तरुणीने इशाऱ्याने पेन आणि कागद मागितला. त्यावर तिने ‘दिलीप राठोड’ असे नाव लिहिले. यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दिलीप राठोडला अटक केली. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!