मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील मुख्य जलवाहिनीला मोठा तडा गेल्यामुळे आज गुरुवार (7 मे) रोजी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
मुंबईत सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. अशा परिस्थितीत अचानक पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या जलकार्य विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या 1650 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला बुधवारी रात्री तडा गेल्याचे निदर्शनास आले. या तड्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाली होती. संबंधित जलवाहिनी शहरातील अनेक भागांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची लाईन असल्याने प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे डी, ई आणि जी-दक्षिण विभागातील अनेक परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. काही भागांमध्ये मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद
डी विभाग
लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बलराम स्ट्रीट, डॉ. डी. बी. मार्ग, पाथे बापूराव मार्ग तसेच संपूर्ण मुंबई सेंट्रल परिसरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच ताडदेव परिसरातील एम. पी. मिल्स कंपाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग आणि ताडदेव भागातही पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
आंबेडकर नगर कॉलनी आणि केशवराव खाड्ये रोड परिसरातही नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
ई विभागातील प्रभावित परिसर
के. के. मार्ग, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, कस्तुरबा रुग्णालय परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.
याशिवाय मौलाना आझाद रोड, डेल स्ट्रीट, डॉ. आनंदराव नायर रोड, मेघराय सेठी मार्ग, मराठा मंदिर रोड, मोहम्मद शहीद मार्ग, कामाठीपुरा १ ते १४ वी गल्ली, चंद्रमणी बुद्ध विहार रोड, आग्रीपाडा परिसर तसेच डॉ. आनंदराव नायर रुग्णालय परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जी-दक्षिण विभागातही पाणीपुरवठा बंद
जे. आर. बोरीचा मार्ग, साने गुरुजी मार्ग आणि धोबीघाट परिसरातही आज दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड आणि खाडिलकर रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
तसेच गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड आणि चौपाटी रोड परिसरातील नागरिकांनाही कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागणार आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, असे सांगितले आहे. दुरुस्तीचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Post Views: 9











