बहुचर्चित ‘टीसीएस’ प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धर्मांतर कटात निदा खान हिचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाला आहे.
यापूर्वी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे आता शहर पोलिसांची विशेष तपास पथके तिचा शोध घेत असून राज्यभरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. तपासादरम्यान धर्मांतरासाठी दबाव, मानसिक त्रास तसेच कट रचल्याचे आरोप पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून अनेक धागेदोरे समोर येत आहेत.
टीसीएसमध्ये सिनिअर अॅनालिस्ट डायलर म्हणून कार्यरत असलेल्या तत्कालीन पुरुष कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून २ एप्रिल रोजी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरुवातीला काही व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने सुरुवातीला बारा ते पंधरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कालावधीत पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट्स तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.
पोलिस तपासादरम्यान चौघा आरोपींसह निदा खान हिचाही धर्मांतर प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यांमुळे निदा खानचा पाय खोलात गेला आहे . देवळाली कॅम्प प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी निदा खानने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून शहरासह राज्यातील विविध ठिकाणी तपास सुरू आहे.
या प्रकरणातील अटकेत असलेले सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, तपास यंत्रणा या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे तपासत आहेत. पोलिसांकडून डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.











