पुणे जिल्ह्यातील भोरमधील नसरापूर इथं ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राभरात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी नसरापूरच्या सैतानाला फासावर लटकवण्याची मागणी होत आहे.
अशातच आता या विकृत नराधमाचं वकीलपक्ष कुणीही घेणार नाही, अशी महत्त्वाची भूमिका भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनने घेतला आहे.
नसरापूर प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे हा पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे. लवकरच या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. पण अशा क्रूर गुन्हेगाराचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही, असा भोर वकील संघटनेकडून ठराव करण्यात आला आहे. भोरनंतर पुण्यातल्याही वकील संघटनेकडून हा निर्णय घेण्यातं आल्याची माहिती भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांनी दिली.
घडलेल्या क्रूर घटनेचा निषेध म्हणून भोर आणि पुणे बार असोसिएशन एकही वकील या घटनेतील आरोपीचं वकीलपत्र स्विकारणार नाही हे वकील संघटनेमार्फत जाहीर करण्यात आलंय. त्याचबरोबर भोर वकील संघटनेतर्फे या क्रूर गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आणि फिर्यादीला वकील संघटनेमार्फत 100 टक्के मदत करण्यात येणारं असल्याचंही भोर बार अससोसिएशन अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांनी जाहीर केलं.
दरम्यान, नसरापूरची घटना दुर्दैवी आहे. अशा आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्याला फासावर लटकावलं पाहिजे. एसआयटी त्यात नेमली आहे एसपी आणि डीजी यांचे लक्ष आहे .मुख्यमंत्र्यांचे देखील लक्ष आहे. फुलप्रुफ चार्जशीट दाखल करत त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी कोर्टात सादर केले जाईल. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. कोर्टाला देखील फाशीसंदर्भात विनंती करणार आहोत. अनेकवेळा गुन्हा केला असतो, अशात त्यांना पॅरोल मिळू नये असं होतं. मात्र आता पॅरोलवर सुटता कामा नये यासाठी राज्य सरकार न्यायालयांना विनंती करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.











