जिद्द आणि चिकाटी असेल, तर माणूस डोंगरही हलवू शकतो, हे आपण ऐकलंय… मात्र साताऱ्याच्या एका 67 वर्षांच्या बहाद्दराने हे प्रत्यक्षात करून दाखवलंय! एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा पराक्रम करंडी गावच्या अशोक जाधव यांनी केला आहे.प्रशासनाची वाट न पाहता, कोणाचीही मदत न घेता, केवळ एका टिकाव आणि फावड्याच्या जोरावर त्यांनी साडेतीन किलोमीटरचा डोंगर पोखरून रस्ता तयार केलाय.
सातारा जिल्ह्यातील श्री सिलोबा गड… निसर्गरम्य परिसर, मात्र गडावर जाण्यासाठी असलेली वाट अत्यंत खडतर, निसरडी आणि जीवघेणी होती. वृद्ध भाविकांना तर तिथे जाणं म्हणजे एक दिव्यच होतं. पण आज चित्र बदललंय. हा रस्ता आता स्वच्छ, सपाट आणि चालण्यायोग्य झालाय. हा चमत्कार कोणत्याही सरकारी यंत्रणेने नाही, तर 67 वर्षांचे माऊंनटन मॅन अशोक जाधव यांच्या अथक प्रत्यत्नांमुळे शक्य झालाय.
अशोक जाधव यांना ना प्रसिद्धीची हाव होती, ना पैशाचा लोभ. दररोज सकाळी 6 वाजता हातात टिकाव, फावडा आणि खोरे घेऊन ते डोंगराकडे निघायचं…आणि रोज किमान 50 फूट रस्ता तयार करायचा, हा त्यांचा दिनक्रम आणि निर्धारही… घरातून सोबत घेतलेल्या बाटलीतलं पाणी संपलं की मगच जाधव घराकडे परतायचे…त्यांच्या या कामाचं आता संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होतंय.
ज्या वयात माणसं निवृत्तीचं आणि आरामाचं जीवन जगतात त्या वयात जाधव यांनी डोंगर फोडण्याचं आव्हान पेललं. त्यांचं हे काम इतरांसाठी प्रेरणादायी तर आहेच…मात्र सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारही आहे. अशोक जाधव यांनी दाखवून दिलंय की, सरकारी निधीची किंवा मोठ्या यंत्रणेची वाट पाहण्यापेक्षा, मनात जर जिद्द असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात.











