थंड हवेच्या ठिकाणी किंवा डोंगराच्या कुशीत फिरायला गेल्यावर कडाक्याच्या थंडीत वाफाळलेली मॅगी खाण्याची मजा काही औरच असते. पर्यटनाला गेल्यावर आपण आवडीने 70 रुपये देऊन ही मॅगी खातो, पण कधी विचार केलाय का की हे मॅगी स्टॉल चालवणारे लोक दिवसाला नक्की किती कमवत असतील?
सोशल मीडियावर सध्या एका कंटेंट क्रिएटरचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्याने डोंगराळ भागात एक दिवस मॅगी विकण्याचा प्रयोग केला आणि त्यातून झालेली कमाई ऐकून भल्याभल्यांना झटका बसेल.
आजकल अनेक तरुण कॉर्पोरेट नोकरीला कंटाळून काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयोग Badal Thakur (बादल ठाकूर) नावाच्या एका तरुणाने केला, जो इन्स्टाग्रामवर ‘yeah_badal’ या नावाने पेज चालवतो. त्याने डोंगराळ भागात मॅगी विकून दिवसाला किती उत्पन्न मिळू शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
बादलने जेव्हा डोंगरावर आपला मॅगीचा स्टॉल लावला, तेव्हा कडाक्याची थंडी होती. अशा वातावरणात गरम मॅगी खाण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली. त्याने एका प्लेटसाठी 70 रुपये किंमत ठेवली होती. पाहता पाहता लोकांनी त्याच्या स्टॉलवर गर्दी केली आणि त्याने दिवसभरात तब्बल 300 प्लेट मॅगीची विक्री केली.
व्हिडिओच्या शेवटी बादलने आपल्या एकूण कमाईचा आकडा जाहीर केला. 70 रुपयांप्रमाणे 300 मॅगी विकून त्याने एका दिवसात तब्बल 21,000 रुपयांची कमाई केली. एका दिवसात इतकी मोठी रक्कम कमावणं कोणत्याही मध्यमवर्गीय नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी आश्चर्याचा धक्काच आहे.
हा झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले, “आता डोंगरावर शिफ्ट होऊन मॅगी स्टॉल उघडण्याची वेळ आली आहे.” दुसऱ्या एका युजरने गमतीने विचारले, “तुमच्याकडे इंटर्नशिप मिळेल का?” अनेक नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या पगाराची तुलना या एका दिवसाच्या कमाईशी करायला सुरुवात केली आहे.
हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी असला तरी, पर्यटनाच्या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या व्यवसायात किती मोठी संधी दडलेली आहे, हे यातून स्पष्ट होते.











