कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या बहिणीच्या आणि साडूच्या मदतीने पतीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह आणि दुचाकी चक्क गोदावरी नदीत फेकून दिली होती. तब्बल ८ महिन्यांपूर्वी घडलेल्या या ‘थंड डोक्याने’ केलेल्या खुनाचा छडा लावण्यात गेवराई पोलिसांना यश आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील रहिवासी उद्धव तुकाराम शिंदे (५०) हे ३ सप्टेंबर २०२५ रोजी पत्नी संगीतासह गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे आपल्या मेव्हणीच्या घरी (सविता विष्णू वाजे) आले होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव शिंदे हे नेहमी पत्नीला मारहाण करत असत. ६ सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने पत्नी संगीताने आपली बहीण सविता आणि साडू विष्णू वाजे यांच्या मदतीने उद्धव यांचा गळा दाबून खून केला.
खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पावले उचलली, विष्णू वाजे याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने सुरुवातीला मृतदेह उसाच्या शेतात लपवला. दोन-तीन दिवसांनी मृतदेहाचा वास येऊ लागल्याने आरोपींनी प्रेत गोणीत भरून दुचाकीवरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिले. त्यानंतर दोन दिवसांनी मृतकाची मोटारसायकलही त्याच पुलावरून नदीपात्रात फेकून दिली जेणेकरून कोणताच पुरावा उरणार नाही. मुख्य आरोपी संगीता शिंदे हिने संशय येऊ नये म्हणून पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
गेल्या ८ महिन्यांपासून हे प्रकरण शांत होते. मात्र, मृतकाचा मुलगा शुभम शिंदे याला वडिलांच्या बाबतीत काहीतरी अघटीत घडल्याचा संशय होता. २ मे २०२६ रोजी शुभमने गेवराई पोलीस ठाणे गाठून आपली शंका बोलून दाखवली. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पांढरवाडी येथून विष्णू आणि सविता वाजे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातून मृतकाच्या दुचाकीचा सांगाडा जप्त केला आहे. मुख्य आरोपी संगीता शिंदे हिला नन्हे (पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात कलम १०३(१), २३८, ६६(२) भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि दीपक लंके पुढील तपास करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किशोर पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.











