पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या नसरापूर गावात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका 65 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वासरू दाखवतो म्हणत चिमुरडीला नेलं अन् तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाराधम आरोपीने अत्याचारानंतर चिमुरडीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यातच लपवण्याचा प्रयत्न केला. शोध घेत असताना कुटुंबीयांना ती जनावरांच्या गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. अशातच या प्रकरणावर पुणे ग्रामीणचे एसपी संदीपसिंग गिल यांनी माहिती दिली आहे.
काल नसरापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. संध्याकाळी चारच्या आसपास ही घटना घडली. त्यानंतर सव्वा पाच वाजता ही घटना पोलिसांकडे रिपोर्ट करण्यात आली. आम्ही त्याचा तातडीने शोध सुरू केला अन् दीड तासात आरोपीला ताब्यात घेतलं. पण दुर्दैवाने तोपर्यंत अत्याचार आणि हत्या झाली होती. आरोपीला अटक केल्यानंतर आता आमचा तपास चालू आहे, अशी माहिती संदीप गिल यांनी दिली आहे.
आम्ही तातडीने चार्टशीप दाखल करण्याचं आश्वासन लोकांना दिलं आहे. तसेच केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा प्रयत्न चालू आहे. आमची विशेष टीम याचा तपास करत आहे. आरोपीविरुद्ध गुन्हे आधीही दाखल आहेत. 1998 मध्ये त्याने विनयभंगचा गुन्हा केला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्याच्यावर पोस्को आणि विनयभंग गुन्हा दाखल झाला होता, पण 2019 मध्ये त्याची सुटका झाली होती. आरोपीची मानसिकताच अशी आहे, असंही गिल यांनी यावेळी स्पष्ट केलं. 65 वर्षाचा आरोपी मजूर म्हणून काम करत होता, असंही एसपींनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर मुलगी अचानक दिसेनाशी झाल्यानंतर तिचा शोध सुरू झाला. तिच्या कुटूंबियांनी तिचा तातडीने शोध घेतला पण ती कुठंच दिसली नाही. याचदरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संबंधित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.











