बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) मार्ंनग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना आज मोठा धक्का बसला. नॅशनल पार्कच्या प्रशासनाने 1 मेपासून मार्ंनग वॉकसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात अचानक आणि अवाजवी वाढ केली आहे.यामुळे मुंबईतील नागरिक आणि निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी वार्षिक केवळ 383 रुपयांत असणारा पास आता वार्षिक 10 हजार रुपये एवढा करण्यात आला आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 45 रुपये इतक्या अल्प दरात उपलब्ध असलेली मार्ंनग वॉकची सुविधा 5 हजार रुपये करण्यात आली आहे. याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे 11,000 टक्क्यांहून अधिक तर इतरांसाठी 2,500 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक राहुल गवई यांनी पत्रक जारी करत या अवाढव्य शुल्कवाढीची घोषणा केली. या पत्रात दरवाढीचे समर्थन करताना उद्यानातील सुरक्षा, स्वच्छता आणि वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेली ही सुविधा आता आवाक्याबाहेर गेली आहे. सर्वसामान्यांकडून इतके शुल्क वसूल करणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे, अशा शब्दांत मुंबईकर या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.











