आधी नाशिकमध्ये खरातकडून महिलांवर अत्याचार आणि व्हीडिओ, त्यानंतर नाशिकचंच रविंद्र एरंडे प्रकरण, मग अमरावतीतील अत्याचार प्रकरणानंतर आता कोल्हापूर सुद्धा अश्याच एका प्रकरणाने हादरलं आहे.
प्रेमाच्या नावाखाली तरुणींना जाळ्यात ओढून अत्याचार, आणि नंतर व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार धक्कादायक समोर आला आहे. तकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोलीत यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. गावात मोठं आंदोलन करत यावेळी लव्ह जिहादचाही आरोप करण्यात आला. यानंतर आरोपीच्या वडिलांनीच समोर येत मुलाला फाशी देण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर ओळख… प्रेमाचं आमिष… आणि नंतर 18 ते 22 वर्षांच्या मुलींना लॉजवर नेत अत्याचार आणि मग ब्लॅकमेलिंग…. ही धक्कादायक घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील शिरोली गावात घडली आहे. 20 वर्षीय तरुणीच्या तक्रारीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कारवाई करत 22 वर्षीय आरोपी शाहीद समीर सनदी याला अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे. शिरोली, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील आणखी 10 हून अधिक तरुणी या आरोपीच्या जाळ्यात अडकल्याचा संशय आहे. या घटनेनंतर शिरोली गावात संतापाची लाट उसळलीये. घटनेचा निषेध म्हणून गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय. यावेळी गावकऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांसोबत आंदोलन करत लव्ह जिहादचा आरोप केलाय. तसच एसआयटी चौकशीचीही मागणी केली आहे.
गावकऱ्यांचा आणि हिंदुत्ववाद्यांची आक्रमक भूमिका बघितल्यानंतर आरोपीने सुद्धा हिंदू मुलींसोबत आपले संबंध असल्याचं सांगत गुन्हा कबूल करत व्हीडिओच्या माध्यमातून माफी मागितली आहे. तसंच व्हीडिओ डिलीट केल्याचंही म्हटलं आहे. तर आरोपीच्या वडिलांनी हात जोडून गावकऱ्यांची माफी मागितली आहे आणि मुलाने केलेल्या कृत्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.
१५ हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत कडून कारवाई केली जात आहे. शाहीद आणि शाहरुख यांच्या घऱाची पाणीजोडणी ग्रामपंचायतीकडून तोडी जात आहे.
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात नराधमाने सुमारे 15 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आज गाव बंद ठेवण्यात आलं. संशयिताकडून पीडित तरुणींचे लॉजवर अश्लील व्हिडीओ बनवत ते व्हायरल करण्याची आणि बदनामीची धमकी देऊन तो तरुणींचे सतत शारीरिक व मानसिक शोषण करत होता. या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त केला जात आहे.
राजरामपुरी पोलीस ठाण्यात 20 वर्षीय पीडितेने तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत शाहीद समीर सनदे (वय २२, रा. पुलाची शिरोली) याला बेड्या ठोकल्या. शाहरुख नावाच्या व्यक्तीला सुद्धा तात्काळ अटक करण्याची गावकऱ्यांची मागणी केली जात आहे.
2022 मध्ये शाहिदने आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे. कोल्हापूर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये शाहीदवर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. शाहिदचा मित्र शाहरुख याला कोल्हापूर पोलिसांनी कराड मधून ताब्यात घेतलं आहे. शाहरुख देसाई याच्या विरोधात देखील दोन महिलांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीची शहानिशा करून शाहरुख देसाई याच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. शाहिद आणि शाहरुख हे दोघेही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत.
एका युवतीच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचे बिंग फुटलं, पण आता यात पीडित तरुणींचा नेमका आकडा किती आहे, त्या तक्रारीसाठी समोर येतात का? या प्रकरणाला खरच लव्ह जिहाद किंवा धर्मांतराचा अँगल आहे का? यात आरोपीला आणखी कोणाचं पाठबळ होतं का या प्रश्नांची उत्तर सुद्धा तपासातून समोर येणं गरजेचं आहे..











