May 15, 2026 6:01 am

गर्दी पाहून मदतीला धावला, पण समोर स्वतःचेच वडील मृत्यूशी झुंज देताना दिसले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जळगावात रस्त्यावर झालेली गर्दी पाहून नेमकं काय झालंय? हे पाहण्यासाठी थांबलेल्या एका तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वतःचे वडील मृत्यूशी झुंज देताना पाहून तरुणाला जबर धक्का बसला.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडलेल्या या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५९ वर्षीय ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तांबापुरा भागातील रहिवासी असलेले मोहंमद मुसा शेख (वय ५९) हे व्यवसायाने सिमेंट ट्रक चालक होते. २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी आपला ट्रक एमआयडीसी परिसरात उभा केला. कामावरून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला फोन केला आणि त्याला बाईक घेऊन नेण्यासाठी बोलावले. मुलगा येईपर्यंत मुसा शेख हे पायी घराच्या दिशेने निघाले होते.

मनराज मोटर्स जवळून पायी जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने मुसा शेख यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की शेख रक्ताच्या थारोळ्यात पडले. दरम्यान, वडिलांना घेण्यासाठी घरातून निघालेला मुलगा याच मार्गावरून जात होता. वाटेत त्याला लोकांची मोठी गर्दी दिसली. काय झालंय ते पाहण्यासाठी तो तिथे थांबला, मात्र समोरचे दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला. ज्या वडिलांना घेण्यासाठी तो निघाला होता, तेच तिथे गंभीर अवस्थेत पडलेले होते.

अपघातानंतर जखमी मुसा शेख यांना तात्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरधाव धडक देऊन पसार झालेल्या त्या अज्ञात वाहनाचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी वाहनचालकाचा माग काढत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!