पुणे : शहरात गुरुवार व शुक्रवारच्या पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त असताना कर्वेनगर परिसरात ‘पाणी एटीएम’च्या माध्यमातून सुरू असलेल्या पाण्याच्या विक्रीबाबत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या १ रुपयात १ लिटर पाणी देणाऱ्या या एटीएममुळे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांची मोठी गर्दी होत असली, तरी तपासणीत हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्वेनगरमध्ये बसविण्यात आलेल्या या पाणी एटीएमबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर स्थानिकांनी पुणे मनपाच्या पाणी खात्याकडे तक्रार केली. त्यानंतर संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांनी त्वरित पाण्याचे नमुने तपासणीस पाठविले. प्राप्त अहवालानुसार सदर पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे, पाणी अयोग्य असल्याचा अहवाल मिळूनही संबंधित ठिकाणी पाण्याची विक्री सुरूच असल्याचे आढळले. सकाळी केलेल्या पाहणीत अनेक विद्यार्थी हेच पाणी विकत घेत असल्याचे दिसून आले. “येथे ५ रुपयांत १० लिटर पाणी मिळते, त्यामुळे ते दिवसभरासाठी पुरते,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची अशी विक्री करण्यास परवानगी आहे का, पाणी अयोग्य असल्यास त्याबाबत सूचना फलक का लावण्यात आलेला नाही, तसेच शहरात अशा प्रकारचे किती ‘पाणी एटीएम’ सुरू आहेत आणि त्यांना मनपाची अधिकृत परवानगी आहे का, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.
दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पुणे मनपाच्या आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागाने संयुक्त तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.











