नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच मित्राकडे अनैसर्गिक संबंधासाठी तगादा सुरु केला होता, त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथे हा प्रकार घडला. नवनाथ लाखाडे असं मयत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी नांदेडच्या पोलीस कर्मचारी अभिषेक सातपुते याच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नवनाथ लाखाडे हा कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी होता. नांदेड पोलीस दलातील कार्यरत असलेल्या अभिषेक सातपुते याच्यासोबत त्याची मैत्री होती. सातपुते हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. दहा वर्षापासून दोघे चांगले मित्र होते.
18 एप्रिल रोजी पोलीस कर्मचारी अभिषेक सातपुते हा वडगाव येथे आला. त्यानंतर दोघे जण आखाडा बाळापूर येथे आले. सायंकाळच्या सुमारास ते पुन्हा वडगाव शिवारात गेले. यावेळी अभिषेकने नवनाथ याच्याकडे अनैसर्गिक संबंध ठेवू दे, असा तगादा लावला. यापूर्वीही त्याने असा तगादा लावला होता, मात्र नवनाथने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आरोपीकडून सतत तगादा सुरु असल्याने या त्रासाला कंटाळून नवनाथने वडगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत नवनाथ यांचं शव उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र जोपर्यंत अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बॉडीवर उत्तरीय तपासणी करू देणार नाही, अशी भूमिका नवनाथच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी घेतली होती.
त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात महिला व पुरुषांचा जमाव एकत्र आला होता. सायंकाळी उशिरा नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीवरून अभिषेक सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर २२ तासांनंतर मृत नवनाथच्या पार्थिवावर उत्तरीय तपासणी करुन तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.










