नागपूरच्या नारा परिसरात दोन दिवसांपूर्वी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृत सुनील शाहू याने आरोपीच्या मुलीवर वाईट नजर ठेवून शरीरसुखाची मागणी केल्यामुळे, संतापलेल्या पित्याने त्याची १६ वार करून हत्या केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नवीन फुंडकर या आरोपीला अटक केली आहे.नारा परिसरातील एका पुलाखाली दोन दिवसांपूर्वी एका पोत्यात रक्ताळलेला मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असता, मृत व्यक्तीची ओळख सुनील शाहू म्हणून पटली. तपासाची चक्रे फिरवत असताना पोलिसांचा संशय नवीन फुंडकरवर बळावला. कारण ज्या पोत्यात सुनीलचा मृतदेह आढळून आला, ते पोतं प्राण्यांना देण्यात येणाऱ्या फूडचं पोतं होतं. अशात आरोपी नवीनचं स्वतःचं ‘पेट शॉप’ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी नवीन फुंडकरला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवीन फुंडकर याने २०२० मध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सुनील शाहू याच्याकडून ५० हजार रुपये उधार घेतले होते. या पैशांच्या मोबदल्यात नवीनने गेल्या काही वर्षांत व्याजासह ९० हजार रुपये सुनील साहूला परत केले होते. मात्र, तरीही सुनील शाहूचे समाधान झाले नव्हते. तो वारंवार पैशांसाठी नवीनला मानसिक त्रास देत होता आणि वसुलीसाठी त्याच्या घरी जात होता.
काही दिवसांपूर्वी सुनील शाहू हा नेहमीप्रमाणे नवीनच्या घरी गेला होता. तिथे त्याने नवीनकडे पैशांची मागणी केली. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. यावेळी साहूने ‘पैसे नसतील तर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव’ अशी मागणी केली. पोटच्या मुलीच्या शारीरिक सुखाची मागणी केल्याने नवीनचा संताप अनावर झाला. नवीनने कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने सुनीलच्या डोक्यावर तब्बल १६ वार केले. या भीषण हल्ल्यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर नवीनने पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीलचा मृतदेह प्राण्यांच्या खाद्यपदार्थांच्या पोत्यात भरला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्याने स्वतःच्याच ई-रिक्षातून हा मृतदेह नारा परिसरातील पुलावरून खाली फेकून दिला. मात्र, ज्या पोत्यात मृतदेह होता, ते पोतं प्राण्यांच्या खाद्याचे असल्याने पोलिसांना नवीनवर संशय आला आणि अखेर या क्रूर कृत्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आरोपी नवीन फुंडकरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.










