April 23, 2026 5:01 pm

सत्तर हजारांसाठी त्यांनी चाकूने चिरला गळा; नदीपात्रातील खुनाचा छडा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

लकडी पुलाजवळील नदीपात्राच्या परिसरात झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी हडपसर परिसरातून पकडले आहे. हे दोघे कर्नाटकातील गदग येथे पळून जाण्याच्या तयारीत होते.

बुधवारी (दि. 22) सायंकाळी गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक वादातून हा खून झाला असल्याची माहिती आहे. ओंकार कांबळे (वय 27, रा. धनकवडी, पर्वती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषल कसबे (वय 42, रा. गंज पेठ) याचा खून करण्यात आला होता. झेड बिज आणि लकडी पूल यांच्यामधील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत रविवारी (दि.19) कसबे याचा मृतदेह सकाळी साडेसातच्या सुमारास आढळून आला होता.

कसबे याचा गळा धारधार शस्त्राने कापण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस अंमलदार आकाश सोनवणे (वय 32, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी ओंकार कांबळे याची दुचाकी शोधून काढली. ही दुचाकी त्यांना हडपसर परिसरात मिळून आली होती. दुचाकीवर रक्ताचे डाग होते. तसेच त्या गाडीच्या डिक्कीत पोलिसांना तीन मोबाईल मिळून आले.

आरोपींनी कसबे याचा खून केल्यानंतर पोलिसांनी आपल्याला पकडू नये म्हणून अंगावरील शर्ट देखील बदलला होता. बुधवारी पोलिसांना माहिती मिळाली होती, खुनातील दोन्ही आरोपी कर्नाटक येथील गदग येथे पळून जाण्याच्या तयारीत आहे. सद्या दोघे हडपसर परिसरात थांबले आहेत. त्यानुसार दोघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत कांबळे याने सांगितले, त्याचा आणि कसबे याचा आर्थिक वाद होता. कसबे याने त्याच्याकडून सत्तर हजार रुपये घेतले होते. त्याच कारणातून त्याचा कांबळे आणि त्याच्या साथीदाराने नदीपात्रात चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर दोघांनी शहरातून पळ काढला होता.

दरम्यान, आर्थिक वादासह हा खून दुसऱ्या कोणत्या कारणातून झाला का हे देखील आता पोलिस तपास करत आहेत. दोघांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील चौकशीत त्यांनी हा खून का केला, हे समोर येईल, असे डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!