April 23, 2026 3:27 pm

*धाकट्या जाऊच्या खूनप्रकरणी थोरल्या जाऊला जन्मठेप

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नवविवाहितेचा गळा आवळून नंतर तिला पेटवून देऊन तिचा खून केल्याप्रकरणी थोरली जाऊ गीता शंकर पाडुळे हिला बार्शी जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी सुभेदार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

उज्ज्वला किरण पाडुळे (वय 21, रा. अंजनगाव उमाटे, ता. माढा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचे वडील सिद्धेश्वर जाधव (मालवंडी, ता. बार्शी) यांनी माढ पोलिसात फिर्याद दिली होती. दि 2 फेब्रुवारी 2023 रोजी खुनाची घटना घडली होती.

दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी उज्वलाचा विवाह किरण लक्ष्मण पाडुळे यांच्याशी झाला होता. तिच्या घरी पती, दीर, सासू, सासरे, जाऊ असे राहण्यास होते. उज्वला हिने माहेरी जाताना तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याच्या रिंगा कपाटात ठेवल्या. परत आल्यानंतर दागिने मिळून आले नाहीत. तिने तिची जाऊ गीता पाडुळे हिच्याकडे विचारपूस केली असता त्यावरून दोघीत भांडण झाले. चोरीचा आळ घेतल्याबद्दल गीताच्या मनात उज्वला बाबत राग होता.

दि 2 फेब्रुवारी 2023 रोजी घरात उज्वला व गीता ह्या दोघीच होत्या. ही संधी साधत गीता हिने उज्वलाचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातच पेटवून दिले. त्यानंतर किचनच्या दरवाज्यातून बाहेर येऊन घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. घटनेच्या वेळेस शेतात काम करत होती, असे दाखवण्याचा प्रयत्न केला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी तर फिर्यादीकडून ॲड. धनंजय माने यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर व महिला पोलीस अमलदार रीना शेख यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेताजी बंडगर यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

परिस्थितीजन्य पुरावे ठरले महत्त्वपूर्ण

तत्कालीन स.पो. नि. शाम बुवा यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून बार्शी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. परिस्थितीजन्य पुराव्यास पूरक असल्याबाबत सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी युक्तिवाद मांडला. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले. या संपूर्ण बाबीचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी अवलोकन करून आरोपीस खून व पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, सदर दंड न भरल्यास सहा महिने कारावास, तसेच अन्य कलमान्वये तीन वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड. तो दंड न भरल्यास एक महिना कारावास, अशी शिक्षा सुनावली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!