April 21, 2026 11:02 pm

*पोलिसांनी उतरवली स्टंटबाजांची झिंग; फौजदारी कारवाईचा बडगा उगारत केला बिमोड

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

डोंबिवली-भिवंडीला जोडणाऱ्या मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाणपुलावर रात्रीच्या सुमारास जीवघेणे स्टंट सुरू झाले आहेत. कार आणि दुचाक्यांवर चालणाऱ्या अशा स्टंटबाजांमुळे स्वतःसह पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका वाढला आहे.

अशा स्टंटबाजांच्या जीवघेण्या रेसकोर्सला डोंबिवलीच्या विष्णूनगर आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी फुलस्टॉप दिला आहे. मोटार वाहन कायद्यासह फौजदारी कायद्यांचा वापर करून पोलिसांनी ५ स्टंटबाजांवर आक्रमक कारवाई केली आहे.

दिवसभर वाहनांनी गजबजलेला हा पूल मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत सुनासुना असतो. या कालावधीत डोंबिवलीसह भिवंडीतील अनेक टवाळखोर हातात दारूच्या बाटल्या मिरवत चखणा घेऊन दुचाक्या आणि कारने पुलावर येतात. यातील अनेक बदमाश पुलाच्या कठड्यांवर बसून बिनधास्तपणे ओल्या पार्ट्या झोडताना आढळून येतात. गांजा भरलेल्या सिगारेटचे झुरके हवेत सोडत या भागात रात्रभर फिरत असतात. हा पूल जणूकाही स्टंटबाजांसाठी रेसकोर्स बनल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाले होते. अशा बदमाशांवर कारवाया केल्या जात नसल्याने पोलिस प्रशासनावर समाज माध्यमांद्वारे तक्रारींचा पाऊस पडत होता. याची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कारवाया करून अहवाल सादर करण्याचे फर्मान सोडल्यानंतर विष्णूनगर आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन स्टंटबाजांच्या विरोधात कारवाईची झोड घेतली.

पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील, तसेच विष्णूनगर आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी रात्री या पुलावर फिल्डिंग लावली होती. उड्डाणपुलावर भरधाव वेगात वाहने चालवून स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडिओ या आधीच बारकाईने तपासले होते. त्यानुसार अचानक कारवाई सुरू करून पोलिसांनी शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या मदतीने एम एच ०५/एफ जी/५६५६ या क्रमांकाच्या थार जिपचा चालक पीयूष द्वारकानाथ म्हात्रे (२१) याच्यावर मोटार वाहन कायद्याचे कलम १०० (२) १७७ प्रमाणे कारवाई करून त्याच्याकडून १५०० रूपये दंड, तसेच दंडाची थकबाकी ३५०० रूपये वसूल केले. एम एम ०५ /जी डी/००४९ या क्रमांकाच्या होंडाई वेर्णा कारचा चालक वेदांत महेश सावंत (१८) याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे कारवाई केली. एम एम ०५/सी व्ही/ ३९८८ या स्कॉर्पिओ जिपमधून भरधाव वेगात रेसींग करणाऱ्या गाड्यांचे मोबाईलद्वारे व्हिडीओ शूट करणारा विशाल दिनेश विश्वकर्मा (२२) आणि कृष्णा जितेंद्र विश्वकर्मा (१९) या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई केली. तर एम एच ४६/सी आर/ ४१११ या स्कॉर्पिओ जिपचा चालक प्रदीप आंबादास ढाकणे (२१) याच्यावर मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

स्टंटबाजी केल्यास गाठ पोलिसांशी

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. मोठागाव-माणकोली खाडीवरील उड्डाण पुलावर कोणत्याही वेळी भरधाव वेगात कार, दुचाक्या वा तत्सम वाहने चालविल्यास अपघात घडून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने असे प्रकार घडल्यास संबंधित वाहनांचे चालक स्वतः, तसेच इतरांच्या मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!