जत शहरातील बाजार समितीच्या आवारात पंचवीस वर्षीय तरुणाचा दगड व विटांनी ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मल्लेश सुरेश पुजारी (वय २५, रा.के. एम. हायस्कूलसमोरील झोपडपट्टी, जत) असे मृत तरुणाचे नाव असून, सोमवारी (ता. ९) सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, जत पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक सचिन थोरबोले व पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी भेट देऊन तपास यंत्रणेस सखोल चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालाचा जल्लोष सुरू असतानाच हा खून झाल्याने जत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की, जत शहरातील के. एम. हायस्कूलसमोर असणाऱ्या झोपडपट्टीत राहणारा मल्लेश पुजारी हा जत बाजार समितीच्या आवारातील एका खताच्या गोदामाच्या कट्ट्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला आढळून आला. बाजार समितीच्या आवारातील काही लोकांनी याची माहिती जत पोलिसांना दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून तपासाची चक्रे गतीने फिरविली.
सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाचा जल्लोष सुरू असतानाच, हा खून झाल्याचे समजताच, एकच खळबळ उडाली होती; परंतु, पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा फिरवत हा खून कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीतून नाही; तर तो अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक तपासातून अंदाज बांधला. शिवाय, याप्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत मल्लशे पुजारी याच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर, पायावर दगड, विटांच्या सहाय्याने गंभीर वार करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन, त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास जत पोलिस करीत आहेत.











