April 23, 2026 10:43 pm

*प्रेमप्रकरणातून गर्भवती महिलेची निर्घृण हत्या

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मध्य प्रदेश राज्यात सीमेलगत खैरी येथील पूनम राकेश तुमाने हिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

ही घटना ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी संजय तितीरमारे याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे मृतक पूनम ही सात महिन्यांची गर्भवती असल्याने या घटनेत दोन जीवांचा अंत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास बोंडराणी जंगल परिसरात स्थानिक नागरिकांना दुर्गंधी अाल्याने परिसरात पाहणी केली असता पूनमचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस निरीक्षक वैशाली ढाले व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास, चौकशी व माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपी संजय तितीरमारे याला अटक केली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता प्रथम ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, तपासात आणखी महत्त्वाच्या बाबी उघडकीस आणायच्या असल्याने दवनीवाडा पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून आरोपीच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ देत ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रेमप्रकरणातून एका निष्पाप महिलेचा व तिच्या गर्भातील अजन्म्या बाळाचा बळी गेल्याने ही घटना समाजाला हादरवणारी ठरली आहे.

भीतीमुळे पूनमचा काटा काढण्याचा कट

पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, पूनम तुमाने हिचा पतीसोबत दीर्घकाळापासून वाद सुरू होते. त्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तिला वारंवार वाराशिवनी (म. प्र.)न्यायालयात हजर राहावे लागत होते. यासाठी घराशेजारी राहणारा संजय तितीरमारे हा तिला मदत करीत होता.

सुनावणीसाठी वारंवार सोबत ये-जा करत असताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दरम्यान, पूनम हिला संजयपासून गर्भधारणा झाली. गर्भधारणेनंतर पूनम ही संजयकडे लग्नाची मागणी करू लागली.

मात्र, संजय आधीच विवाहित असून त्याचे कौटुंबिक आयुष्य सुरळीत सुरू होते. हे प्रकरण उघडकीस आल्यास समाजात बदनामी होईल व संसार उद्ध्वस्त होईल, या भीतीने संजयने पूनमचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

असा केला खून

२८ जानेवारी रोजी न्यायालयीन सुनावणीसाठी जात असल्याचे सांगून संजयने पूनमला तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात आणले. निर्जनस्थळी नेल्यानंतर पूनमने पुन्हा लग्नाचा विषय काढून त्याच्यावर दबाव टाकला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात संजयने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. ओळख पटू नये म्हणून तिच्या डोक्यावर वारंवार घाव घालून चेहरा विद्रूप केला व मृतदेह जंगलात फेकून तो पसार झाला होता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!