April 23, 2026 4:52 pm

*सांगलीतलं असं एक गावं जिथं सकाळपासून एकानंही केलं नाही मतदान, काय आहे कारण?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

एकिकडे सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाचा उत्साह असतानाच, तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांनी मात्र लोकशाहीच्या या उत्सवावर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला.

गावात नियोजित असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या मोठ्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ संपूर्ण गावाने मतदानाकडे पाठ फिरवली.

नेमकं प्रकरण काय?

बलगवडे येथील गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून एक सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, हा प्रकल्प उभारताना गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पोटच्या लेकरासारख्या जपलेल्या आणि लावलेल्या सुमारे साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीरपणे ही झाडे तोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वृक्षतोडीमुळे गावातील पर्यावरणाचं मोठं नुकसान झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

दुपारपर्यंत एकही मत नाही!

बलगवडे गावाची एकूण मतदार संख्या सुमारे २३०० इतकी आहे. प्रशासनाकडून दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, वृक्षतोड करणाऱ्या सोलर प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण गावाने बंद पाळून मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळी मतदान केंद्र सुरू होऊनही दुपारपर्यंत याठिकाणी एकही मतदार फिरकलेला नाही. मतदान केंद्रावर केवळ अधिकारी आणि पोलीस तैनात असून, गावाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रकल्प हलवण्याची मागणी

“आम्ही पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी झाडे लावली होती, सरकारने ती तोडली. आता आमची एकच मागणी आहे की, हा सौर ऊर्जा प्रकल्प गावातून हलवून अन्यत्र न्यावा,” अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे शासन वृक्षारोपणाचा संदेश देत असताना, दुसरीकडे सरकारी प्रकल्पासाठीच इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने प्रशासकीय धोरणांवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!