शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (ता. ६) रात्री अडीचच्या सुमारास घडल्याचे सीसीटीव्हच्या माध्यमातून निदर्शनास आले.
मंदिराचे पुजारी रामदास भालेराव सकाळी साडेपाचच्या सुमारास मंदिरात पूजेसाठी गेला असता त्यांना मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचे व मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील पैसे चोरून नेल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ गणेश राऊत यांना याबाबत फोन केला. चोरीच्या घटनेची माहिती सरपंच प्रदीप थोरवे, पोलीस पाटील अमोल थोरवे यांनी पोलिसांना सदर घटने संदर्भात माहिती दिली. त्यानंतर हावलदार गणेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली व पुजारी भालेराव यांची फिर्याद नोंदवून घेतली.
रात्रीच्या वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटीतून सुमारे ४० ते ४५ हजार रुपये चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बीट अंमलदार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भरत मुठे व सागर शिंदे यांनी संजय बोऱ्हाडे, संतोष राऊत, शंकर लोहोकरे या पंचासमक्ष चोरीच्या घटनेचा पंचनामा केला. पोलिस खात्याच्या एलसीबी आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून दिपक साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. या घटनेचा अधिकचा तपास जुन्नर पोलीस करत आहेत.
चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गावपातळीवर मंदिरांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंदिरातील मौल्यवान दागिने वस्तू उत्सवाच्या काळात सुरक्षितपणे ठेवाव्यात. मात्र, त्या कायमस्वरूपी मंदिरात ठेऊ नयेत. वेळेवेळी दानपेटी उघडून त्यातील पैशाची मोजदाद करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. आपल्या परिसरात अज्ञात संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी पोलिस खात्याच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तत्काळ माहिती द्यावी._ किरण अवचर, पोलिस निरीक्षक, जुन्नर











