हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने वाहन व वाहतूक व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले असून ईव्हीएम वाहतूक करणाऱ्या सर्व शासकीय व खासगी वाहनांवर जीपीएस यंत्रणेद्वारेही सतत लक्ष ठेवले जाणार आहे.
मतदान पथकांना वेळेत मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी पूर्वनियोजित वाहतूक आराखड्यानुसार वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या वाहतूक योजनेमुळे दुर्गम व ग्रामीण भागातील मतदान केंद्रांपर्यंत पथकांची वाहतूक सुरळीत पार होणार आहे. मतदारसंघनिहाय वाहनांचे प्रकार व आवश्यक संख्येचे नियोजन करून संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्यानुसार वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणारी सर्व वाहने सुस्थितीत व स्वच्छ असल्याची खात्री करूनच ती निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणार आहेत. तसेच वाहनचालक, कंडक्टर व सहाय्यक यांची मतदार यादीतील नोंदणी माहिती आधीच संकलित करून संबंधित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संपूर्ण वाहन व वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी नोडल अधिकारी अमित रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत आहे.











