पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) खासगी संस्थेकडून चालवण्यात येतो. या संस्थेसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सामंजस्य करार करण्यात येणार असून, रुग्णालयातील एकूण १७ आयसीयू खाटांपैकी (बेड) ७ खाटा महानगरपालिका ताब्यात घेणार आहे.
या ७ खाटांवर दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत अतिदक्षता उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. फेब्रुवारीअखेर ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.
कमला नेहरू रुग्णालय हे राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) अंतर्गत संलग्न असल्याने, रुग्णांच्या बहुतेक शस्त्रक्रिया व उपचार खर्च आधीच या योजनेतून मोफत होत आहेत. मात्र, रुग्णालयातील आयसीयू सुविधा ही पैसे भरून घ्यावी लागत असल्याने गुंतागुंतीचे रुग्ण ससून रुग्णालयात पाठवावी लागतात. सध्या या आयसीयू कक्षाचे उपचार शुल्क केंद्रीय आरोग्य योजनेच्या दरानुसार आकारले जाते. येथे १७ खाटा असून, प्रथम प्राधान्य रुग्णालयातील अंतर्गत रुग्णांना दिले जाते. मात्र, परवडणाऱ्या दरात आयसीयू खाटाची गरज असलेल्या इतर रुग्णालयांतील रुग्णांनाही येथे उपचाराची सुविधा दिली जाते.
आता महानगरपालिका ७ आयसीयू खाटा ताब्यात घेणार असल्याने रुग्णांना मोफत आयसीयू सेवा, आवश्यक साहित्य आणि उपचार सुविधा उपलब्ध होतील. आयसीयू उपलब्ध झाल्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील येथेच करता येतील, अशी माहिती महानगरपालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे काम सुरू असून, फेब्रुवारीअखेर ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याच वर्षाअखेरीस महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पहिली एमबीबीएस विद्यार्थ्यांची तुकडी शिकावू म्हणून रुग्णालयात रुजू होईल, त्यामुळे रुग्णालयाची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल, असेही डॉ. बळीवंत यांनी सांगितले.
आरोग्य विभागप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनीही ७ खाटा महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली आल्याने रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा देता येणार असल्याचे स्पष्ट केले. अलीकडेच रुग्णालयात १७ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे उपचार क्षमता आणि सेवा अधिक सक्षम होतील. असेही त्या म्हणाल्या.











