जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण संवेदनशील असताना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोकसागरात असताना, पांडुरंग पवार यांचे वर्तन पक्षशिस्तीला बाधा आणणारे असल्याचा ठपका पक्षाकडून ठेवण्यात आला आहे. पवार हे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम करत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पांडुरंग पवार यांची सून कविता संदीपान पवार या बोरी बुद्रुक – खोडद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कविता पवार यांना उमेदवारी न मिळाल्याने पांडुरंग पवार यांनी नाराजी व्यक्त करत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला होता. पक्षाने हा राजीनामा मंजूर केला असून, त्याचबरोबर त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षविरोधी कारवाया, अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार तसेच पक्षशिस्तीचे उल्लंघन या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त अधिक कडक करण्यात येणार असल्याचा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याचे पडसाद येत्या निवडणुकांवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.











