खराडी परिसरात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना मंगळवारी (ता. ३) पहाटे अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून साडेबारा लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.
या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. वाघोली; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. वाघोली; मूळ रा. बाडमेर, राजस्थान) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक तीन फेब्रुवारी रोजी पहाटे खराडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आयटी पार्क फेज- दोनच्या परिसरात दोघेजण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून २७ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य मिळून १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक पंडित रेजीतवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्या पथकाने केली.











