बारामती येथील विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. यात अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता.
विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या गावी (तरडगाव, ता. फलटण) जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले.
सुनेत्रा पवारांनी विदीप जाधव यांच्या पत्नी आणि मुलांना धीर दिला. ‘कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,’, असा शब्द त्यांनी यावेळी जाधव कुटुंबीयांना दिला. या भावस्पर्शी भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.
विदीप जाधव यांच्या मागे आई-वडील, १४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अपघाताच्या वेळी त्यांचे आई-वडील मूळ गावी होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. गेल्या २२ वर्षांपासून मुंबई पोलीस दलात असणाऱ्या जाधव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याचे पालन केले.
28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अजित पवार यांचे विमान कोसळले होते. यात अजित पवारांसह वैमानिक सुमीत कपुर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यृ झाला.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत येत होते. एकाच दिवशी त्यांच्या बारामती परिसरात चार सभा होणार होत्या. आता या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करण्यात येणार आहे.











