April 20, 2026 1:02 am

*परीक्षा देण्यासाठी निघालेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरातील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिज येथे मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बेलापूर येथील कार्तिक भंडारी (वय १८) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक हा परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेला असताना हा काळजाचा ठाव घेणारा अपघात घडला.

एमएच ५०-३८७७ क्रमांकाच्या ट्रकची ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार धडक बसल्यानंतर दुचाकी थेट ट्रकच्या चाकाखाली अडकली. या भीषण अपघातात कार्तिक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करत नागरिकांच्या मदतीने जखमी कार्तिकला तत्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला लोणी प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच कार्तिकचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. कार्तिकच्या अकाली निधनाने भंडारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे याच रेल्वे ओव्हरब्रिजवर काही दिवसांपूर्वी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. मागील महिनाभरात या ठिकाणी चार ते पाच गंभीर अपघात घडून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेवासा रोडवरील हा रेल्वे ओव्हरब्रिज अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत असून येथे वाहनांची ये-जा अत्यंत धोकादायक झाली आहे. ओव्हरब्रिजवर दोन्ही बाजूंना स्वतंत्र मार्गिका, वेगमर्यादा फलक, गतिरोधक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!