“एकदा खुर्चीत बसल्यानंतर अधिकारी असल्याची गुर्मी डोक्यात चढते; मात्र तसे होता कामा नये. अधिकारी म्हणून नव्हे, तर लोकांचे सेवेकरी म्हणून काम करा आणि नागरिकांची कामे तत्परतेने पूर्ण करा,” असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.
राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत निवड झालेल्या २१ नव्याने नियुक्त लेखापालांना मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, लेखा संचालिका तेरेझा फर्नांडिस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध सरकारी पदांसाठी गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक निवड प्रक्रिया राबवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील टेक्निकल असिस्टंट, कनिष्ठ अभियंता यांसारखी पदेही आयोगामार्फत भरली गेली असून, ही प्रक्रिया पुढेही सुरू राहील.
मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली.
बंदर कप्तान खात्यात उपकप्तान पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.
तिस्क, फोंडा येथील आरोग्य खात्याची जमीन जी यापूर्वी कला व संस्कृती खात्याकडे होती, ती पुन्हा आरोग्य खात्याकडे हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी आरोग्य खात्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
कुडणे येथील सतीचे भाट परिसरात रस्त्याच्या बांधकामासाठी तसेच जमिनीच्या देवाण-घेवाणीस मान्यता.
गोमेकॉ (GoMC) येथील सामान्य शस्त्रक्रिया विभागातील रिक्त पदे भरेपर्यंत कंत्राटी पद्धतीने दोन व्याख्यात्यांची नियुक्ती करण्यास मंजुरी.
गोमेकॉतील पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी रोस्टर पद्धत लागू करण्याचा निर्णय.
तुये इस्पितळाचे २ फेब्रुवारीला उद्घाटन
तुये हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन २ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या इस्पितळासाठी ५० परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांसह एकूण २७ पदांच्या नियुक्तीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
“लोकांच्या मागणीनुसार हे इस्पितळ गोमेकॉशी संलग्न करण्याची अधिसूचना याआधीच काढण्यात आली आहे. आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि इतर व्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाच्या प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली असून, तुये हॉस्पिटल व रिसर्च सेंटर लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल,” असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू उपस्थित होते.
अजित पवारांना आदरांजली
दरम्यान, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनी एक मिनिट स्तब्धता पाळून दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली.











