मुंबई: मुंबईचा महापौर कोण होणार याबद्दल बरीच चर्चा सुरु असताना महापालिका निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजप आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणीच अद्याप झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजप आणि शिंदेसेनेचा संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता असा संयुक्त गट तयार केला जाणार नसल्याची माहिती आहे.
संयुक्त गट म्हणून नोंदणी झाल्यास शिंदेसेनेला पुढील ५ वर्षे महापालिकेत भाजपचंच धोरण अवलंबावं लागेल. त्यामुळे महापालिकेत शिंदेसेनेत स्वतंत्र अस्तित्व नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडून त्यांच्या नगरसेवकांच्या गटाची स्वतंत्र नोंदणी केली जाणार असल्याचं सुत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले आहेत. निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपचे ८९, तर शिंदेसेनेचे २९ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीला ११८ जागांवर यश मिळालं आहे. सत्ता स्थापनेसाठी ११४ चा आकडा गरजेचा आहे.
निकाल लागून दीड आठवडा होत आला तरीही भाजप, शिंदेसेनेनं अद्याप कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी केलेली नाही. महापौरपद, उपमहापौर, विविध वैधानिक आणि विशेष समित्या यांचं अध्यक्षपद आणि सदस्यत्व यावर भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. सर्वाधिक महत्त्वाच्या स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची सदस्य संख्या समान येत असल्यानं विरोधकांची संख्या कमी करण्यासंदर्भात अभ्यास सुरु होता. सत्ताधारी आणि विरोधकांचे १३-१३ सदस्य स्थायी समितीवर सदस्य म्हणून जातील.
भाजप आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी संयुक्त कोकण आयुक्तांकडे नोंदणी केल्यास सत्ताधारी पक्षाचा एक सदस्य वाढू शकतो. पण संयुक्त नोंदणीनंतर दोन्ही पक्षांचा गटनेता एकच असेल. अशा परिस्थितीत पालिका सभागृहात आणि अन्य समित्यांमध्ये भाजप घेत असलेल्या भूमिकेला समर्थन देणं शिंदेसेनेसाठी बंधनकारक असेल. सोबतच महापालिकेत दोन्ही पक्षांना एकच कार्यालय मिळेल. कोणत्या समित्यांवर शिंदेसेनेला किती प्रतिनिधीत्व द्यायचं, याचा निर्णय घेण्याचा अधिकार भाजपच्या गटनेत्याला असेल. त्यामुळेच स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय शिंदेसेनेनं घेतला आहे.











