आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. पोटच्या मुलीची आईनेच निर्घृण हत्या केली आहे. अंबिका प्रजापती (वय 15) असं मृत मुलीचं नाव आहे.
पोटच्या मुलीची आईने केली हत्या
प्रजापती कुटुंब नालासोपारा येथील संतोषभवन परिसरातील तांडापाडा येथील विद्या विकासने चाळीत वास्तव्यास आहे. काल शनिवारी दुपारच्या सुमारास आई आणि मुलगी यांच्यात वाद झाला. यावेळी आई कुमकुम हिने मुलीच्या डोक्यात थेट वरवंट्याने वार करुन पोटच्या मुलीला ठार केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तुळीज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत मुलगी अंबिका प्रजापती ही पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी बहीण होती. आई प्रजापती आणि मुलगी अंबिका प्रजापती या दोघांमध्ये वाद होत असल्याचं समोर आलं आहे. मोठी बहीण अंबिकाने लहान भावंडांना मारहाण केल्यानं आईने मारहाणीला विरोध केला. या वादात रागातून आईने मुलगी अंबिकाच्या डोक्यात थेट वरवंटा मारला, वरवंटाने डोके ठेचून मुलीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कुमकुम प्रजापती हिला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.











