पुणे :
पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अविनाश शिळीमकर यांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (२६ जानेवारी २०२६) “उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक” जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या दीर्घकालीन, धाडसी व परिणामकारक सेवेमुळे हा बहुमान मिळाला असून पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
श्री. शिळीमकर यांनी पुणे ग्रामीण, नागपूर शहर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये सेवा बजावताना अनेक कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर प्रभावी कारवाई केली आहे. नागपूर शहरात कार्यरत असताना खून, दरोडा, खंडणी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण ३८ गुन्ह्यांचा छडा लावून कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच नागपूर शहरातील दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.
अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची व शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असताना स्वतः फिल्डवर उतरून सराईत टोळीचा शोध घेऊन चोरीस गेलेली जनावरे व माल शेतकऱ्यांना परत मिळवून दिला. कोरोना महामारीच्या काळात गरजू नागरिक, स्थलांतरित मजूर तसेच कोरोना बाधित पोलीस बांधवांसाठी वैद्यकीय सुविधा, उपचार व मदतीची प्रभावी व्यवस्था केली.
नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना वाढत्या दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यात त्यांनी यश मिळवले. यवत येथे एकाच कुटुंबातील सात जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सखोल तपास करून खुनाचा प्रकार उघडकीस आणला. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी चोरीस गेलेल्या ईव्हीएम मशिन्सचा छडा लावून आरोपी अटक करून निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कायम ठेवली.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळ्या, अमली पदार्थ तस्करी, अवैध शस्त्रसाठा यावर केलेल्या कारवायांमुळे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीला आळा बसला आहे. याच कालावधीत एमपीडीए व मोक्का कायद्यांतर्गत अनेक धोकादायक गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्ध कामकाजामुळे श्री. अविनाश शिळीमकर यांना यापूर्वी सन २०२४ मध्ये पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती पदकाच्या घोषणेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.











