दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने रविवारी एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित यंत्रणांच्या तत्परतेमुळे हे विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी दिल्लीहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E 2608 ला लँडिंगदरम्यान संभाव्य सुरक्षेचा धोका असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच ठरलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार तात्काळ संबंधित सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.
विमान पुणे विमानतळावर उतरल्यावर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना कोणताही धोका होऊ नये यासाठी विमानाच्या मुख्य टर्मिनलपासून दूर नेण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोध व नाशक पथकाने (BDDS) विमानाची सखोल तपासणी केली. तपासादरम्यान इंडिगोच्या एका विमानाच्या टॉयलेटमध्ये धमकीची चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तपास यंत्रणांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, धमकी खोटी की गंभीर याचा शोध घेतला जात आहे.
पोलीस तपास अपडेट
इंडिगो फ्लाइट 6E 2608 ला मिळालेल्या बॉम्ब धमकी प्रकरणाचा तपास सुरू
विमानाच्या टॉयलेटमध्ये आढळलेल्या धमकीच्या चिठ्ठीचा जप्ती पंचनामा
बॉम्ब शोध व नाशक पथकाकडून विमानाची संपूर्ण तपासणी पूर्ण
पुणे विमानतळ पोलीस, ATS आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा संयुक्त तपास
विमानातील CCTV फुटेज, प्रवाशांची यादी आणि क्रू मेंबर्सची चौकशी सुरू
धमकी खोटी की गंभीर याचा तांत्रिक तपास सुरू
चिठ्ठी कोणी आणि कशा परिस्थितीत ठेवली याचा टाइमलाइननुसार शोध
याआधीच्या इंडिगो विमान धमक्यांशी संबंध आहे का, याचीही चौकशी
दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाईचे संकेत
इंडिगो एअरलाइन्सकडून देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रवासी, कर्मचारी आणि विमानाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. भविष्यातही अशा कोणत्याही परिस्थितीत सर्व सुरक्षा नियमांचे आणि मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्यात येईल, असेही कंपनीने नमूद केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीही दिल्लीहून बागडोगराला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E-6650 ला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे लखनऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. सलग मिळणाऱ्या अशा धमक्यांमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ पुणे विमानतळावरील हालचालींवर परिणाम झाला होता. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत तपास यंत्रणांकडून देण्यात आले आहेत.











