April 20, 2026 9:10 am

वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारणारी टोळी जेरबंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी-चिंचवड शहरात वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून बसथांब्यांवर सोनसाखळी कापून चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीवर गुन्हे शाखा युनिट-१ने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत अवघ्या एका तासात तीन महिलांना अटक केली. या कारवाईत सुमारे ५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यात सोन्याचे दागिने व स्पोर्ट्स बाईकचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पीएमपीएमएल बसथांब्यांवर वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कापून चोरी करण्याचे प्रकार वाढीस लागले होते. तसेच शहरातील विविध भागांत घरफोड्यांचे सत्र सुरू होते. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी विशेष पथके तैनात केली.

 

सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून मिळाला सुगावा

गुन्हे शाखेच्या पथकाने सतर्क पेट्रोलिंग करत घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस शिपाई चिखलकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार निगडी बसस्थानक परिसरात मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळ तीन महिला एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कापून पळून जात असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. महिला पोलीस हवालदारांच्या मदतीने तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र व गंठण जप्त करण्यात आले. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अंतरराज्य टोळी असल्याचे उघड

तपासात अटक केलेल्या महिला या अंतरराज्य चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर कर्नाटकातील अफजलपूर, गुलबर्गा, विजयपुरा तसेच महाराष्ट्रातील बाद्रा, परभणी, दादर व कुर्ला येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

घरफोडीचे दोन गुन्हे उघड

याच तपासादरम्यान बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घरफोडी करणाऱ्या एका आरोपीसह चोरीचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी दिघी पोलीस ठाणे हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली.

त्यानुसार दिघी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ व ०८/२०२६ हे दोन गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

 

स्पोर्ट्स बाईक चोरी प्रकरणात विधिसंघर्षित बालक ताब्यात

दरम्यान, दुचाकी चोरीच्या तपासात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना मिळालेल्या माहितीनुसार एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ नुसार गुन्हा उघड करण्यात आला.

 

५ लाखांचा मुद्देमाल जप्त

या सर्व कारवायांमध्ये गुन्हे शाखेने

सोनसाखळी चोरी,

घरफोडी,

दुचाकी चोरी

असे एकूण गुन्हे उघड करत सुमारे ५,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!