April 23, 2026 10:53 pm

चार सदस्यांच्या वॉर्डमध्ये एकालाही यश नाही

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ११९ नगरसेवक निवडून आले असून, १८ प्रभागांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनेल विजयी झाले आहे. केवळ तीन प्रभागांत भाजपला खाते उघडता आलेले नाही. उर्वरित १० प्रभागांमध्ये तीन, सात प्रभागांमध्ये दोन सदस्य निवडून आले आहेत. गोखलेनगर – वाकडेवाडी, रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर आणि पुणे स्टेशन – जयजवान नगर या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत.

 

सन २०१७ च्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता होती. महापालिकेतील १६२ पैकी भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दोनने वाढ होऊन भाजपच्या नगरसेवकांची संख्या ९९ झाली होती. ४१ प्रभागांपैकी १५ प्रभागांमध्ये भाजपचे चारही सदस्य निवडून आले होते, तर सात प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन, असे २१ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या विजयाचे गणित २२ प्रभागांमध्ये दडलेले होते. या २२ प्रभागांमधूनच ८१ नगरसेवक निवडून आले होते. ४१ प्रभागांपैकी ३४ प्रभागांमध्ये भाजपचा किमान एक तरी नगरसेवक निवडून आला होता.

भाजपने यंदा निवडणूक लढवताना विरोधी पक्षांचे प्राबल्य असलेल्या सात प्रभागांवर लक्ष केंद्रित केले होते. महापालिकेची प्रारूप प्रभागरचना नव्याने करताना विरोधी नगरसेवकांचे प्राबल्य असलेल्या सात प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झाले होते; तसेच यातील तीन प्रभागांवर थेट वर्चस्व असलेले आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, विधानसभेची निवडणूक लढविलेले सचिन दोडके, सायली वांजळे यांचा भाजपप्रवेश करून घेण्यात आला. या प्रवेशांमुळे या निवडणुकीत थेट तीन प्रभाग पूर्णपणे जिंकण्यात भाजपला यश आले. गेल्या निवडणुकीतील ९७चा आकडा ११९पर्यंत पोहोचवण्यासाठी यंदा या चाली खेळल्या गेल्या.

यंदाच्या निवडणुकीत भाजप शहराच्या सर्व भागांत पसरल्याचे चित्र निकालानंतर उमटले. वडगाव शेरी, हडपसर विधानसभा मतदारसंघात फटका बसेल, अशी शक्यता असताना या ठिकाणी चांगल्या संख्येने नगरसेवक निवडून आले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील; तसेच प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी यांनी या दोन मतदारसंघांत काही खेळी खेळल्या. त्यामुळे या ठिकाणी नगरसेवकांची संख्या वाढली आहे.

निर्भेळ यश मिळालेले १८ प्रभाग

विमाननगर-लोहगाव, खराडी-वाघोली, कल्याणीनगर-वडगाव शेरी, औंध-बोपोडी, बावधन-भुसारी कॉलनी, छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी, मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क, कसबा गणपती-कमला नेहरू रुग्णालय-केईएम रुग्णालय, शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई, नवी पेठ-पर्वती, डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी, मयूर कॉलनी-कोथरूड, वारजे-पॉप्यूलरनगर, नन्हे-वडगाव बुद्रुक धायरी, सनसिटी-माणिकबाग, सहकारनगर-पद्मावती, धनकवडी-कात्रज डेअरी, कोंढवा बुद्रुक येवलेवाडी, या १८ प्रभागांत भाजपला फायदा झाला.

 

तीन सदस्य असलेले प्रभाग

कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित, कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा, मांजरी बुद्रक-केशवनर-साडेसतरानळी, रामटेकडी-माळवाडी, शंकरमहाराज मठ-बिबवेवाडी, काशेवाडी-डायस प्लॉट, घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी, बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज, अप्पर सुपर इंदिरानगर.

 

दोन सदस्यीय प्रभाग

सूस-बाणेर-पाषाण, हडपसर-सातववाडी, वानवडी-साळुंखे विहार, रविवार पेठ-नाना पेठ, जनता वसाहत-हिंगणे खुर्द, शिवणे-खडकवासला धायरी पार्ट, महंमदवाडी-उंड्री.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!