कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पनवेलच्या पाच भाविकांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलीस ठाणे परिसरात देवडी पाटी इथं शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातातील भाविक पनवेल इथून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी अर्टिगा कार (MH-46 Z 4536) झाडावर आदळून हा अपघात घडला आहे. रात्री वेगात वाहन चालवताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात जाऊन धडकली. कारमध्ये एकूण सहा प्रवासी (तीन पुरुष व तीन महिला) होते. सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू : अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या कारच्या भीषण अपघातात पाच भाविक जाग्यावरच ठार झाले आहेत. ज्योती जयदास टाकले, (रा. सेक्टर ७, पनवेल, जि. रायगड) ही महिला प्रवासी जखमी आहे. जखमी महिलेस तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ इथं दाखल करण्यात आल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
अपघातानंतर कार अडकली झुडपात :
झाडावर कार आदळून अपघात झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे नागरिकांनी ही माहिती तत्काळ मोहोळ पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी पोलीस मदत पुरवून आवश्यक कार्यवाही करण्यात आली. अपघातात मृतदेह पूर्णतः वाहनामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर अपघातग्रस्त कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकलेली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.











