April 24, 2026 1:13 am

डबेवाल्याचा मुलगा ते नगरसेवक; मंगेश पांगारेंची संघर्षगाथा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

रोज पहाटे घराबाहेर पडणारा, सायकलवर डबे लटकवत मुंबईच्या रस्त्यांवर धावणारा डबेवाला. . त्याचा मुलगा थेट मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून पोहोचतो, ही केवळ एक राजकीय घटना नाही, तर ती संघर्ष, कष्ट, स्वप्नं आणि जिद्दीची गोष्ट आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून मंगेश दत्ताराम पांगारे शिवसेनेकडून विजयी झाले आणि हा विजय साजरा झाला तो थेट ग्रँट रोड स्टेशनवर. भावाचा मुलगा नगरसेवक झाल्याचा आनंद व्यक्त करत, डबेवाला कामगार सिताराम पांगारे यांनी आपल्या सहकाऱ्यांना पेढे वाटले. स्टेशनवर घाईगडबडीत धावणाऱ्या डबेवाल्यांच्या चेहऱ्यावर आज मात्र थकवा नव्हता. होता तो फक्त अभिमान आणि आनंद. याच पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश पांगारे यांनी सांगितले.”डबेवाला समाजाच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्या मार्गी लावणार,” असं स्पष्ट केलं.

 

तीन पिढ्यांचा संघर्ष, आज फळाला आला :

मंगेश पांगारे यांचे वडील, आजोबा डबेवाले होते आणि आजही त्यांचे चुलते डबेवाला म्हणून काम करतात. तीन पिढ्यांनी घाम गाळून मुंबईला जेवण पुरवलं. आज त्याच कुटुंबातील एक तरुण थेट महानगरपालिकेच्या सभागृहात पोहोचला आहे. हा विजय केवळ मंगेश यांचा नाही, तर तो संपूर्ण डबेवाला समाजाचा आहे. म्हणूनच आज डबेवाल्यांच्या डोळ्यांत आनंद आहे. आता आमचा हक्काचा नगरसेवक सभागृहात आहे. आता आमच्या समस्या कोणी तरी ऐकणार, असा विश्वास आता डबेवाल्यांना आहे. डबेवाला समाज अनेक वर्षांपासून आपल्या समस्या मांडत आला आहे, पण त्या कधीही गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. आता मात्र आशा आहे, अशी भावना सध्या डबेवाला संघटना व्यक्त करत आहेत.

अजूनही फाईलमध्ये अडकलेली विशेष वैद्यकीय सेवा मार्गी लावणार :

“मुंबई महानगरपालिकेनं डबेवाला कामगारांसाठी विशेष वैद्यकीय सेवा देण्याचा ठराव यापूर्वीच मंजूर केला होता. मात्र ही फाईल आजही आयुक्तांकडं प्रलंबित आहे. आज मी डबेवाला कुटुंबातून आलेला नगरसेवक सभागृहात बसणार असून, या निर्णयावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब व्हावं, यासाठी प्रयत्न करेन,” अशी भावना मंगेश पांगारे यांनी व्यक्त केली.

 

आम्ही फेरीवाले नाही, तरीही दंड :

“डबेवाले हे फेरीवाले नाहीत. तरीही अनेक ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या सायकली जप्त करत, त्यावर दंड आकारत होते. यामुळे अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीवर परिणाम होत होता. यावर उपाय म्हणून मुंबई मधल्या मोक्याच्या ठिकाणी डबेवाल्यांसाठी सायकल पार्किंगची व्यवस्था केली जाते,” असं मंगेश पांगारे यांनी सांगितलं.

 

हा विजय स्वाभिमानाचा आहे :

“डबेवाले म्हणजे केवळ डबे पोहोचवणारे लोक नाहीत, तर ते मुंबईची शिस्त, वेळ आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक आहेत. आज त्याच समाजातून एक प्रतिनिधी सभागृहात गेला आहे. हा विजय सांगतो, स्वप्नं लहान नसतात, परिस्थिती लहान असते,” असं मंगेश पांगारे यांच्या विजयाबद्दल मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांनी सांगितलं. “डबेवाल्यांचा एक प्रतिनिधी मुंबई महानगर पालिका सभागृहात गेला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मंगेश पांगारे यांची ही पहिली टर्म आहे, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मंगेश पांगारे यांना समिती अध्यक्षपद देण्याची विनंती मुंबई डबेवाला असोसिएशनकडून केली जाईल,” असंही ते म्हणाले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!