April 24, 2026 1:14 am

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे / पिंपरी-चिंचवड :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीचे स्पष्ट कल समोर येऊ लागले असून, दोन्ही शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) निर्णायक मुसंडी मारल्याचे चित्र आहे. पुण्यात भाजपने पन्नासचा आकडा पार केला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये थेट बहुमत मिळवत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का दिला आहे.

पुणे महानगरपालिका : भाजपची घोडदौड

पुणे महानगरपालिकेतील ताज्या आकडेवारीनुसार भाजप तब्बल ५४ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

शरद पवार गटाची राष्ट्रवादी २, काँग्रेस ४ आणि शिंदे गटाची शिवसेना २ जागांवर आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांना अद्याप खातेही उघडता आलेले नाही.

प्रभागनिहाय महत्त्वाचे निकाल

प्रभाग क्रमांक २० (शंकर महाराज मठ, बिबेवाडी) येथून भाजपचे राजेंद्र शेळमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे यांनी विजय मिळवला आहे. या प्रभागात भाजपचे स्पष्ट वर्चस्व दिसून आले.

प्रभाग क्रमांक ३६ (सहकारनगर) मध्ये भाजपची ताकद अधिकच ठळक झाली. या प्रभागात अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, शिंदे गटाचे आबा बागुल आणि अश्विनी कदम यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या निकालाने अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे बोलले जात आहे.

मतमोजणीदरम्यान गोंधळ

दरम्यान, प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ठोंबरे-पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. या वादामुळे जवळपास तासभर मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मतमोजणी पुन्हा सुरू करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड : कमळ फुलले, घड्याळ थांबले

अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने ७० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४० जागांवर समाधान मानावे लागले, तर शिंदे गटाला ६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवार गट आणि मनसे यांना प्रत्येकी १ जागा मिळाल्याची माहिती आहे.

अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतः लक्ष घालून सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच रोखत राजकीयदृष्ट्या मोठा संदेश दिला आहे.

थोडक्यात निकाल स्थिती

पुणे महानगरपालिका:

भाजप – ५४

अजित पवार गट – ७

काँग्रेस – ४

शरद पवार गट – २

शिंदे गट – २

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका:

भाजप – ७० (बहुमत)

अजित पवार गट – ४०

शिंदे गट – ६

राजकीय विश्लेषण

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपने वर्चस्व सिद्ध करत स्थानिक राजकारणावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दुसरीकडे, अजित पवार गटासाठी हे निकाल मोठा धक्का मानले जात असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!