लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच प्रभाग क्रमांक 11 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भाजपच्या (BJP) एका उमेदवाराच्या नातेवाईकाने मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या उमेदवारासह कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. ही घटना घडल्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती संशयास्पदरीत्या परिसरात फिरत असताना त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्या खिशातून मोठी रक्कम तसेच मतदारांची नावे आणि उमेदवाराचे नाव लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यामुळे पैसे वाटपाचा संशय अधिक बळावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी माझ्या वैयक्तिक कामासाठी बाहेर पडलो होतो. माझ्याकडे असलेले पैसे हे माझे स्वतःचे आहेत. त्यांचा निवडणुकीशी किंवा कोणत्याही प्रकारच्या पैसे वाटपाशी काहीही संबंध नाही,” असा खुलासा त्याने केला आहे.
या प्रकारानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, नेमकी रक्कम कशासाठी होती, चिठ्ठीतील नावे कशाशी संबंधित आहेत, याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे लातूर महापालिका निवडणुकीतील प्रचाराला आणखी धार चढली असून, पैसे वाटपाच्या आरोपांवरून येत्या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, लातूर महापालिका निवडणुकीमध्ये उभे असलेल्या तब्बल 17 अपक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) पाठिंबा देत पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे यांनी पक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.











