September 4, 2026 9:26 am

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला मोठे वळण; बंडू फाटक यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

फरार आरोपीला आश्रय दिल्याचा होता आरोप; केवळ जेवण व राहण्याची व्यवस्था केल्याने ‘आश्रय’चा गुन्हा सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असलेले बंडू फाटक यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे यांना पवना धरण परिसरातील फार्महाऊसवर आश्रय दिल्याचा आरोप फाटक यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, या आरोपांच्या आधारे त्यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.

पुणे सत्र न्यायालयात बंडू फाटक यांनी खटल्यातून डिस्चार्ज मिळावा यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. फाटक यांच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

बचाव पक्षाने युक्तिवाद करताना, एखाद्या व्यक्तीला केवळ जेवण देणे किंवा राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे म्हणजे कायद्याच्या अर्थाने ‘Harbouring’ ठरत नाही, असे नमूद केले. संबंधित व्यक्तीला गुन्ह्याची माहिती होती आणि ती माहिती असूनही फरार आरोपीला लपविण्याचा जाणीवपूर्वक हेतू होता, हे ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध होणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

उच्च न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत केवळ संशयाच्या आधारे एखाद्या व्यक्तीला सहआरोपी ठरवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. फरार आरोपीला निवारा किंवा जेवण उपलब्ध करून दिल्याचा आरोप स्वतंत्रपणे मुख्य गुन्ह्याशी जोडण्यासाठी आवश्यक पुरावे असणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर बंडू फाटक यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हुंड्याच्या मागणीवरून सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात पती, सासू, सासरे, नणंद आणि अन्य आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणात पोलिसांनी एकूण ११ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये वैष्णवी यांच्या सासरच्या कुटुंबातील सदस्यांसह फरार आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या काही व्यक्तींचाही समावेश होता. जुलै २०२५ मध्ये पोलिसांनी १,६७० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

बंडू फाटक यांना मिळालेल्या या न्यायालयीन दिलाशामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणातील न्यायालयीन घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. मात्र, फाटक यांची निर्दोष मुक्तता ही त्यांच्यावरील विशिष्ट ‘आश्रय’च्या आरोपासंदर्भातील आहे; त्यामुळे प्रकरणातील इतर आरोपींबाबतची न्यायालयीन प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू राहते, हे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!