September 4, 2026 4:46 pm

अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर अपघात; वाहनचालक पसार, पोलिसांत गुन्हा दाखल

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर रविवारी रात्री झालेल्या अपघातात एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. पुणे बाजूकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पादचारी तरुणाला धडक दिल्याने राकेश उर्फ अक्षय अंबेश नाईक (वय २४, रा. साकार नगरी, नारायणगाव) याचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.

ही घटना रविवारी रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर घडली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश उर्फ अक्षय नाईक हा नारायणगाव येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच तो आपल्या वडिलांना गवंडी कामात मदत करत होता. राकेशच्या वडिलांचा गवंडी कामाचा व्यवसाय असून, त्यातूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षण आणि कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी अशा दोन्ही भूमिका राकेश पार पाडत होता.

रविवारी रात्री राकेश हा मित्रांसमवेत बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला होता. चहा घेतल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तो बाह्यवळण रस्त्यावरून पायी नारायणगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात राकेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची घटना घडल्यानंतर अज्ञात वाहनचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

राकेश उर्फ अक्षय नाईक याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राकेशच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, राकेशच्या पार्थिवावर आज दुपारी मीना नदीकाठावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे नारायणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन संबंधित चालकावर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!