पुणे : शास्त्रीनगर आणि विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्पांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिले.
शास्त्रीनगर चौक येथील प्रस्तावित ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल तसेच विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक–विश्रांतवाडी जंक्शन परिसरातील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रकल्पाच्या कामाचा आयुक्तांनी गुरुवारी आढावा घेतला. या वेळी प्रकल्पांची सद्यस्थिती, कामातील अडचणी आणि पुढील कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने सुमारे ७५० मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे. तसेच आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या दिशेने सुमारे ७०० मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे शास्त्रीनगर चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
शास्त्रीनगर येथील प्रकल्पाचे काम मार्च २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामाला गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
दरम्यान, विश्रांतवाडी येथील उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असून, आळंदी रस्ता ते विमानतळ रस्ता या दिशेतील ग्रेड सेपरेटरच्या कामात काही अडथळे निर्माण झाले आहेत. श्री रामेश्वरशेठ गणपती मंदिराचा काही भाग तसेच श्री महालक्ष्मी देवी मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्याची माहिती आयुक्तांना पाहणीदरम्यान देण्यात आली.
हा अडथळा एका महिन्यात दूर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), पुणे व पिंपरी-चिंचवड, बांधकाम विकास विभाग, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण विभाग आणि संबंधित जागामालक यांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच संयुक्त जागा पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
चौकातील वाहतूक पुढील टप्प्यात वळविल्यानंतर चौक आणि आळंदी रस्ता बाजूकडील उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना देण्यात आल्या.
विश्रांतवाडी येथील प्रकल्पाचे काम यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शास्त्रीनगर आणि विश्रांतवाडीतील हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नगर रस्ता, गोल्फ चौक, कल्याणीनगर, गुंजन चौक, आळंदी रस्ता आणि विमानतळाच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.











