कृष्णा नदीचे पूजन; वाईच्या ऐतिहासिक मंदिरांच्या वास्तुकला व कलाकुसरीचे कौतुक
वाई, ता. ११ : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष रवी अगरवाल यांनी वाई येथील प्रसिद्ध श्री महागणपती मंदिरास सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. महाबळेश्वर येथे आयोजित आयकर विभागाच्या पश्चिम विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना त्यांनी वाईला भेट दिली.
या वेळी अगरवाल यांनी कृष्णा नदीचे विधिवत पूजन केले. त्यानंतर श्री महागणपती मंदिरात अभिषेक व आरती केली. तसेच ऐतिहासिक काशीविश्वेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.
वाईतील ऐतिहासिक मंदिरांची वास्तुकला, घाटांची रचना आणि मंदिरांवरील कलाकुसर याबाबत त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली. गणपती घाट, घाट परिसरातील मंदिरे तसेच त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती त्यांनी जाणून घेतली. महागणपती आणि काशीविश्वेश्वर मंदिरातील भव्य नंदी, प्राचीन मंदिर मंडपाची रचना आणि उत्कृष्ट कलाकुसरीचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या भेटीप्रसंगी महासंचालक (अन्वेषण), पुणे जगजीवन कुमार गर्ग, मुख्य आयकर आयुक्त (पुणे) विवेक वाडेकर, आयकर विभागाचे अतिरिक्त महासंचालक (अन्वेषण) तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महागणपती व काशीविश्वेश्वर मंदिराचे विश्वस्त विश्वास गोखले, सी. व्ही. काळे, वाई अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अरुण देव, चेतन काळे तसेच लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय मर्ढेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
वाईच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाची ओळख करून देणारी ही भेट ठरली. मंदिरांची प्राचीन वास्तुकला, कलाकुसर आणि कृष्णा नदीकाठच्या घाटांचे सौंदर्य पाहून अगरवाल यांनी समाधान व्यक्त केले.











